सांगली । पाणी व्यवस्थापन आणि क्षारपड जमीन सुधारणा या प्रश्नावर जागतिक पातळीवर काम करणाऱ्या अमेरिकेतील ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीतील तज्ञाचे शिष्टमंडळ आज (मंगळवारी) राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील क्षारपडग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना ‘उपायांचा कानमंत्र’देणार आहेत. आरआयटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा परिसंवाद होणार आहे. तत्पूर्वी हे पाच सदस्यीय शिष्टमंडळ कारखाना कार्यक्षेत्रातील क्षारपड जमिनीची पाहणी करून कारखान्यास सदिच्छा भेट देणार आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत.
प्रा.डॉ.विनायक शेडेकर,प्रा.डॉ.केव्हीन किंग,प्रा.डॉ.स्कॉट शिअरर,प्रा.डॉ.अस्मिता मुरूमकर,प्रा.डॉ.नथान स्टोल्टफुख अशी शिष्ट मंडळातील सदस्यांची नांवे आहेत. विशेष म्हणजे शेडेकर हे इस्लामपूरचे सुपुत्र असून ते अमेरिकेतील ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक दादा पाटील हे गेली काही वर्षापासून कारखाना कार्यक्षेत्रील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे शिष्टमंडळ भारतात येत आहे.
गेल्या ३०-३५ वर्षांपूर्वी वाळवा तालुक्या च्या शिवारात पाणी आले आणि तालुक्याच्या समृध्दीची पहाट झाली. मात्र तालुक्यात समृध्दी आली,त्याचबरोबर क्षारपड जमिनीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी व खतांच्या अतिवापराने दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादन कमी होत आहे. एका बाजूला उत्पादन खर्च वाढत असताना दुसऱ्या बाजूला उत्पादन कमी येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. हे या क्षेत्रातील तज्ज्ञ या परिसरातील शेतकऱ्यांना या विषयावर महत्वाचे मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन कारखान्याच्या मार्फत करण्यात आले आहे.
कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील,जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील,डॉ.प्रकाश म्हाळुंगकर,तसेच आरआयटीचे प्राध्यापक, कारखान्याचे अधिकारी या शेतकरी संवादाचे नियोजन करीत आहेत.