कोल्हापूर । सांस्कृतिक परंपरा जपणारं शहर म्हणजे कोल्हापूर, दसरा सोहळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, अशा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी याही वर्षी दसरा चौकात उत्सव प्रेमी जनतेची, भाविक तसेच पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय होती. पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षीही जिल्हा प्रशासनाकडून जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून संपुर्ण नवरात्रोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या
पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव तसेच गौरवशाली परंपरा असलेला दसरा सोहळा दिमाखात साजरा झाला.
पुर्वीची संस्थानं संपली, लोकशाही आली पण अजूनही तोच सन्मान राजर्षी शाहू महाराज घराण्याला करवीर नगरी देते. दसरा चौकात करवीर निवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभागाच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. दसरा सोहळ्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. बंदुकीच्या फैरी झडताच उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी सोने व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
या सोहळयास पालकमंत्री हसन मुश्रीफ, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, संजय डी.पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, श्रीराम पवार, दसरा महोत्सव समितीचे सदस्य यांच्यासह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते. यावेळी प्रसन्न मालेकर यांनी उपस्थितांना दसरा सोहळ्याबद्दल माहिती दिली.
मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष – मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणूकीचे नियोजन जिल्हा प्रशासन व दसरा नियोजन समिती सदस्यांनी केले. नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी दसरा चौकात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून कार्यक्रम निर्विघ्न पार पाडला.