परभणी । भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. सन 2024-25 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावा असे आवाहन ग्रंथालय संचालनामार्फत करण्यात आले आहे.
सन 2024-25 साठीच्या समान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत.
इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना रु. 25 लाख (उपरोक्त योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत) सन 2024-25 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी रु. 4 लाख व इमारत बांधकाम रु. 10 ते 15 लाख), राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान “ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (रु. 2 लाख 50 हजार) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (रु. 2 लाख), महोत्सवी वर्ष जसे 50,60,75,100,125,150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य – (6 लाख 20 हजार व इमारत विस्तार रु. 10 लाख), राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (रु. 1 लाख 50 हजार, रु. 2 लाख 50 हजार, रु. 3 लाख), बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बालकोपरास्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य रु. 6 लाख 80 हजार.
उपरोक्त योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/ हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत सादर करावेत असे आवाहन केले आहे.