पारदर्शक व निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुकांचे नियोजन – केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
- महिला मतदारांच्या नोंदणीत 10.17 लाखांची वाढ. 7.74 लाख महिला नवमतदार
- कातकरी, कोलम, मारिया गोंड या आदिवासी मतदारांची 100 टक्के नोंदणी
- शहरी भागातील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टींग
- 19.48 लाख नवमतदार
- उंच इमारतींमध्ये एक हजार 118 मतदान केंद्रांची सुविधा
- यादीत नाव तपासण्यासाठी VHA तर गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी C-Vigil ॲप
मुंबई | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणार असल्याची माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील दोन दिवसांच्या आढावा दौऱ्यानंतर ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची नावे आणि कारणं पक्षांना जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ती माहिती उमेदवारांनीसुद्धा जाहीर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हॉटेल ट्रायडंट येथे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने यंत्रणांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री.राजीव कुमार माध्यमांना संबोधित करत होते. निवडणूक आयुक्त सर्वश्री ग्यानेश कुमार, डॉ.सुखबीर सिंह संधू, वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त सर्वश्री धमेंद्र शर्मा, नितेश व्यास, मनीश गर्ग, उप निवडणूक आयुक्त सर्वश्री हर्देश कुमार, अजित कुमार, मनोजकुमार साहू, संजय कुमार, सह संचालक अनुज चांडक आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम उपस्थित होते.
यावेळी त्यांनी राज्यातील निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण असल्याचेही सांगितले. या दोन दिवसांत आम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. राजकीय पक्षांकडून दिवाळीचा सण बघून निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. ‘आमचा महाराष्ट्र आमचं मतदान’, अशी टॅगलाईन असेल, तर महाराष्ट्रात 9 कोटी 59 लाख मतदार आहेत. 12 लाख 48 हजार मतदार हे 85 वर्षांवरील अधिक नवमतदारआहेत. तर 350 मतदान केंद्र नवतरूण अधिकारी हाताळतील.
यावेळी बोलतांना राजीव कुमार म्हणाले की, आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसेच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला कऱण्यात आली, असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरुष मतदार हे 4. 95 कोटी आहेत. तर स्त्री मतदार हे 4.64 कोटी आहेत. तसेच दिव्यांग 6.32 लाख आहेत. तर थर्ड जेंडर मतदार हे 5997 आहे. याचबरोबर पहिल्यांदा मतदान करणारे मतदार हे 19.48 लाख आहेत. जो सभेसाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज करेल त्याला मैदान देण्याची संधी दिली जाईल. अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. जो सभेसाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज करेल त्याला मैदान देण्याची संधी दिली जाईल. अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. काही मतदार केंद्र फक्त महिलांकडून नियंत्रित केले जाईल. गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 300 चेक पोस्ट नाके तयार केले जातील.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरपूर्वी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोहोचलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शुक्रवारी (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. यादरम्यान भारतीय जनता पक्षाने आठवड्याच्या शेवटी मतदान घेण्याऐवजी कामकाजाच्या दिवसात मतदान प्रक्रिया घेण्याची सूचना केली, तर काँग्रेसने ‘रहिवासी सोसायट्यां’मध्ये मतदान केंद्र उभारण्यास आक्षेप घेतला.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना जाहिरात द्यावी लागणार
राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी उमेदवारांनी स्वतः आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती किमान तीन वेळा प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहीर करणे बंधनकारक आहे, तर अशा उमेदवारांना उमेदवारी देण्यामागे पक्षाची काय भूमिका आहे, याबाबतही राजकीय पक्षांनी जाहीर करणे बंधनकारक असल्याचे राजीव कुमार म्हणाले.
मतदारांना ‘या’ ॲपवर करता येणार तक्रार
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आले आहे. या ॲपद्वारे मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या ॲपवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम त्याठिकाणी पोहचेल, असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास C-Vigil ॲपवर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संदर्भातील माहिती KYC (Know Your Candidate) या ॲपवर उपलब्ध असणार आहे
निवडणूक काळात एटीएम व्हॅनला निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. तसेच याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवले जाईल, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कडक धोरण…
तीन वर्षांपेक्षा जास्त ज्या अधिकाऱ्यांची सेवा झाली त्यांना तात्काळ बदला असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसांत बदल्या करा, असे आदेश दिले असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.
मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन…
दरम्यान, येत्या निवडणुकीत राज्यातील सर्व मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आपण आवाहन करीत आहोत. जम्मू-काश्मीर आणि गडचिरोली सारख्या संवेदनशील भागातही मतदानाची टक्केवारी अधिक असताना राज्यातील कुलाबा पुणे, मुंबादेवी, अशा शहरी भागातील मतदानाचा टक्का मात्र घसरलेला दिसतो. केवळ 40 टक्क्यांच्या आसपास इथे मतदान होते. त्यामुळे अद्यापही ज्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदविले नाही ते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. ही प्रक्रिया आयोगामार्फत निरंतर सुरू आहे, असे सांगून सर्व मतदारांनी आपल्या लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.राजीव कुमार यांनी यावेळी केले.