प्रश्न 1) या वर्षी महालय/पितृपक्ष आरंभ आणि समाप्ती कधी आहे?
या वर्षी बुधवार दि.18 सप्टेंबर 2024 पासून महालय आरंभ सुरू होतो आणि शनिवार दि.02ऑक्टोबर 2024 ला संपंतो.
(पंचांगाधार -दाते)
प्रश्न 2)– पितृपक्ष म्हणजे काय ?
पितृपक्ष श्राद्धासाठी सांगितला आहे,म्हणून इतर कामासाठी अशुभ असतो का?
महालय( पितृपक्ष )म्हणजे जसे आपण एखाद्या जिवंत व्यक्तीचा एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी त्यांचा आदर सत्कार करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो,त्याच प्रमाणे मृत व्यक्तीची कृपा लाभण्यासाठी त्यांचा सत्कार संपन्न करण्याचा कालखंड म्हणजे महालय पितृपक्ष/(पंधरवडा) होय.
पितृपक्ष म्हणजे शास्त्रात श्राद्धासाठी सांगितला आहे,म्हणून काही जण अशुभ मानतात तर तो अशुभ नाही.काहीजण तर या काळात विवाह हा शब्द देखिल उच्चारत नाहीत,तर तो एक गैरसमज आहे.तर शास्त्रात या पंधरा दिवसात काही कामे वर्ज जरी सांगितली असली तरी विवाह बोलणी,नवीन वाहन खरेदी.शेतीची कामे इ .कामे करण्यास काहीच हरकत नाही .
महालय याचे अपभ्रष्ट रूप महाळ असे होते.म्हणून याला आपण महाळ असेही म्हणतो.भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितृपक्ष आणि मुख्य महालय काल म्हणून ओळखला जातो .
प्रश्न 3) महालय श्राद्ध आणि प्रति सांवत्सरिक श्राद्ध यात फरक काय?
प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीस उद्देशून केले जाते तर महालय श्राद्ध आपल्या विशिष्ट नात्यातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून केले जाते .
थोडक्यात महाळ म्हणजे सामुदायिक भोजन आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्ध म्हणजे एकाच व्यक्तीला आमंत्रित करून दिले जाणार भोजन.
अर्थात महालय श्राद्ध हे वडिलांचे वर्ष श्राद्ध झाल्यावर आपल्या संबंधित सख्खे नाते संबंधातील मृत व्यक्तींना उद्देशून केले जाते . यासाठी आपल्या संबंधातील पितरांची नावे गोत्रासह यांची यादी तयार करून ठेवावी लागते .
प्रश्न 4) तर ती यादी कोणती?
ती यादी खालील प्रमाणे
1) पितृत्रयी ( वडील ,आजोबा पंणजोबा),
2) मातृत्रयी (आई ,आजी,पणजी )
3) सावत्र आई ( सख्खी आई हयात असेल तर सापत्न मातेचे एकोदिष्ट करावे .)
4) मातामह त्रयी (आईचे वडील आजोबा पणजोबा
5) मातामहीत्रयी (आईची आई आजी )
6) पत्नी
7) विवाहित कन्या (दुहिता)
8) चुलते (काका)
9) मामा
10) भाऊ
11) पुत्र
12) आत्या
13) मावशी
14) बहिण
15) सासरे
16) गुरु
17) शिष्य
18) (अप्तातील नातेसंबंधित सोडून सपिंडातील इतर,तसेच मित्र उपकर्ता इ. व्यक्ती )
(ग्रंथाधर 21 व्या शतकातील काल सुसंगत आचारधर्म दाते पंचाग)
यासाठी सर्वांसाठी पिंडदान व तर्पण करावयाचे असते.या मध्ये ज्याची पत्नी मृत असेल त्यांनी पुरुषाच्या नावाबरोबर सपत्नीक असे म्हणावे आणि ज्या स्त्रीचा पती मृत असेल त्यांनी स्त्रीच्या नावाबरोबर सभर्तृक असे म्हणावे.आत्या मावशी बहीण जीवित असता त्यांचे पती गेले असता त्यांचा समावेश करू नये.तसेच काका मामा भाऊ मुलगा जीवित असतात त्यांच्या पत्नी गेल्या असतात त्यांचाही समावेश येथे करू नये.
प्रश्न 5) पितृपक्षात केले जाणारे महालय श्राद्ध कोणत्या तिथीस करावे?
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावस्या पर्यंत रोज करायचे असते परंतु असे करणे शक्य नसेल तर वडिलांच्या तिथीला करावे.न जमल्यास पितृपक्षातील चतुर्दशी सोडून अन्य कोणत्याही तिथीला करता येते.संपूर्ण पितृपक्षात महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सूर्य तूळ राशीत असण्याच्या कालावधीत (16 नोव्हें. पर्यंत) तिथीला करता येते.परंतु अधिक अश्विन मास वर्ज करून उर्वरित गौण कालात म्हणजे (वृश्चिक दर्शनात) करता येईल.
प्रश्न 6) खरंतर महालय श्राद्ध का करायचे कारण मानव योनी खेरीज दुसऱ्या योनीत पितर जन्मास गेले असले तर त्यांना आपले अन्न कसे उपयोगी पडेल?फायदा काय?
फारच छान प्रश्न आहे.
सूर्य लोक,चंद्र लोक,पितृ लोक इत्यादी लोक व पुनर्जन्म मानलेच नाहीत हा प्रश्न संभवत नाही.पण पुनर्जन्म हा तर हिंदू धर्माचा सिद्धांत आहे.शिवाय आता पुनर्जन्माचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.तेव्हा कर्मतत्व व पुनर्जन्म मानणे भागच आहे.कर्मानेच पुनः जन्म मिळतो.जन्माला आल्यानंतर कर्म करावेच लागते.मृत्यूनंतर त्याने केलेले कर्मच फक्त त्याचे बरोबर जाते.कर्मानुगो गच्छति जीवए : । हा म्हणून कर्म हे मानवी जीवनाचे उपादान कारण आहे असे शास्त्र सांगते.शास्त्राने पितरांचे श्राद्ध करावे असे सांगितले आहे.कोणत्याही धार्मिक कृत्यात श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे.मरणोत्तर जीवन हा विषय गहन व अवघड असला तरी तो समजून घेणे आवश्यक आहे.मरणोत्तर जीवन असते ते दिव्य शरीरधारी व वायुरूप असते.तथापि हे मानवी शरीरातील दर्शन देऊ शकते .
दशरथाने मरणोत्तर रामाला दर्शन दिले होते.कौरव पांडव युद्धात मरण पावलेल्या योद्ध्यांना व्यासानी अल्पकाळ पुनः इहलोकी बोलावून आणले होते असे महाभारतात वर्णन आहे.श्रीमद शंकरचार्यांना व्यासानी दर्शन दिले होते.मंडन मिश्र व संत एकनाथ यांना अनेक पितराने दर्शन दिले होते.तात्पर्य मनुष्य मेला की सर्व संपले असे नाही .
गरुड पुराणात तर त्याचे विस्तृत वर्णन आहे .
मृत पितर हे पितृ योनीतच आहेत की त्यांना अन्य जन्म मिळाला आहे हे समजण्यास मार्ग नाही.पितृ योनीतून मुक्त होऊन त्यांना सद्गती प्राप्त होण्याकरता पुत्रांनी यावज्जीव यांचे श्राद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते.श्राद्ध कर्मातील ब्राह्मण भोजन द्वारा व पिंड दान द्वारा मृत पितरांना अन्न मिळते . महाभारतातील कथेवरून सिद्ध आहे.पितामह भीष्म आपल्या पित्याचे शंतुचे श्राद्ध गंगेच्या काठी करीत होते .आता पिंडदान करणार एवढ्यात शंतूनचा हात गंगेतून वर आला मला अतिशय भूक लागली आहे तेव्हा दर्भावर पिंडदान न करता माझे हातावरच पिंड दे म्हणजे मी ते लगेच खाईन अशी आकाशवाणी भीष्माना ऐकू आली असे वर्णन महाभारतात आहे.
अर्थात महालय श्राद्ध केल्याने आपल्या नातेसंबंधातील सर्व मृत व्यक्तींविषयी स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त केले जाते त्यामुळे सर्व पितरांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळून ऐहिक आणि पारलौकिक फळ कर्त्यांस मिळण्यास मदत होते .म्हणून श्राद्ध कर्म करणे आवश्यक आहे .
प्रश्न 7) अविधवा नवमीच्या संदर्भात थोडक्यात सांगा?
सौभाग्यवती मृत झाल्यावर त्यांच्यासाठी अविधवा नवमीचे दिवशी श्राद्ध केले जाते .
वडील हयात जिवंत असेपर्यंत मुलाने मुलगा नसेल तर पत्नीने अविधवा नवमीचे श्राद्ध करावे.मात्र वडिलांच्या निधनानंतर म्हणजे वडिलांचे वर्षश्राद्ध झाल्यावर अविधवा नवमीचे श्राद्ध करणे बंद करावे .कारण वडिलांचे महालय श्राद्ध सुरू होते.पौर्णिमेचा महालय पितृपक्षात भरणी श्राद्ध व्यतिपात योग ,अष्टमी श्राद्ध द्वादशी श्राद्ध किंवा सर्वपित्री श्राद्ध या पैकी कोणत्याही एका दिवशी करावे पौर्णिमेचा महालय पौर्णिमेच्या दिवशी करू नये.अविधवा नवमी शस्त्रादिहत पितृ श्राद्ध ,मातामह श्राद्ध ,संन्यासीनां महालय पितृपक्षात होऊ शकले नाही तर पुढे महालय समाप्ती पर्यंत करता येते .
एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे वर्षश्राद्ध झाल्यावर येणाऱ्या पितृपक्षात महालय अविधवा नवमी करावे .
प्रश्न 8) भरणी श्राद्ध म्हणजे काय? भरणी श्राद्ध कधी करावे ?
हे श्राद्ध पितृपक्षात भरणी नक्षत्रावर केले जाते म्हणून याला भरणी श्राद्धा असे म्हटले जाते .
पितृपक्षात भरणी नक्षत्रावर गया श्रद्धाचे फळ मिळावे उद्देशाने आई-वडिलांसाठीचे भरणी श्राद्ध केले जाते.वास्तविक वर्ष श्रद्धा नंतर भरणी श्राद्ध करणे संयुक्तिक आहे.तरी प्रथम वर्षी सुद्धा भरणी श्राद्ध करावे अशी सुद्धा वचने असल्याने प्रथम वर्षी भरणी श्राद्ध केले जाते.पितृपक्षात भरणी श्राद्ध त्या दिवशी होऊ शकले नाही तर मात्र पुढील वर्षी करावे.
प्रश्न 9) मला जंगम/ब्राह्मण भोजनासह श्राद्ध करायचे नसेल तर यासाठी पर्याय आहेत का?
हो नक्कीच काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केले पाहिजे ही भूमिका आपली नक्कीच सकारात्मक आहे.
त्यासाठी खालील प्रमाणे पर्याय आहेत.
1) सहपिंडक जंगम /ब्राह्मण भोजनासह
2) सहपिंडक अमान्न ( शिदा देऊन )
3) सदपिंड चटश्राद्ध
4) ब्रह्मार्पन ब्राह्मण भोजनासह
5) ब्रह्मार्पन अमानन्न ( शिधा देऊन )
6) हिरण्यश्राद्ध
7) मानसिक संकल्प करून जंगम /ब्राह्मणास भोजन पर्याप्त दक्षिणा देऊन नमस्कार करणे.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री, वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.