1) विवाह नंतर प्रथम वर्षी नववधुने आषाढ पाळण्यासाठी माहेरी जावे का?
विवाहनंतर प्रथम वर्षी येणाऱ्या आषाढ मासातून सासरी राहिल्यास सासूला वाईट तसेच जेष्ठ महिन्यात जेष्ठ दीराला वाईट,पौष महिन्यात सासर्याला वाईट,अधिक (मल) मासात पतीस वाईट असल्याने त्या त्या महिन्यात संपूर्ण महिना त्या सुनेने सासरी राहू नये म्हणजेच माहेरी राहावे असे सांगितले आहे पण हा विचार आता कालबाह्य झालेला आहे पूर्वीच्या काळी मुलीच्या विवाहाचे वय आठ ते बारा वर्षाचे असायचे त्या लहान वयात संसार वैवाहिक सुख या गोष्टीशी त्या मुलीचा संबंध असायचा.आईची तसेच माहेरची ओढ असल्याने त्या त्या महिन्यात माहेरी जाऊन आईकडून काही गोष्टी शिकता याव्यात तसेच सुरुवातीला काही काळ सासरी आणि काही काळ माहेरी राहण्याची ती एक व्यवस्था म्हणून हा नियम सांगितला असावा.
सध्याच्या काळात मुलीच्या विवाहाचे वय नोकरी करणाऱ्या मुली,याचा विचार करता महिनाभर माहेरी राहू शकत नाहीत .त्यामुळे हा विचार व हे नियम पाळण्याची आवश्यकता नाही.असे विचार काल सुसंगत आचारधर्म दाते पंचांग करते यांनी त्यांच्या ग्रंथात मांडले आहेत.त्यामुळे आषाढ पाळण्याची गरज नाही.
2) या महिन्यास आषाढ मास असे का म्हटले आहे.
या चंद्र महिन्यातील पौर्णिमेच्या जवळ पुर्वाषाढा नक्षत्र असते म्हणून यास आषाढ मास असे म्हटले आहे.
3) चातुर्मासाचा काल आणि चातुर्मासाचे थोडक्यात महत्त्व काय आहे?
या महिन्याच्या एकादशी पासून चातुर्थमास सुरू होत असल्याने या महिन्याचे विशेष महत्त्व.या महिन्याला शुची असे देखील म्हटले जाते.
आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतच्या चार महिन्याच्या काळातला चातुर्मास म्हणतात.यामध्ये श्रावण,भाद्रपद अश्विन यापैकी अधिक मास आल्यास चातुर्मास पाच महिन्याचा असतो.आषाढ शुद्ध एकादशी पासून चातुर्मास्या आरंभ होतो.आषाढी एकादशीला शयनी एकादशी म्हणतात आणि कार्तिकी एकादशीला प्रबोधनी एकादशी म्हणतात.शयनी एकादशी पासून देव झोपतात व प्रबोधनी एकादशीला देव जागे होतात.या काळात असुर प्रबल होतात म्हणून या काळात अनेक व्रते करण्यास धर्मशास्त्रात सांगितले आहे.धार्मिक भाग सोडला तर निसर्गाप्रमाणे हे चार महिने पर्जन्याचे असतात.या काळात निरनिराळे रोग होतात,पचनशक्ती कमी होते म्हणून उपवास व्रते करण्यास सांगितले आहे.असुर याचा अर्थ येथे रोग अनारोग घेण्यास हरकत नाही.आपल्या धर्मशास्त्रात सर्वच गोष्टी आरोग्य व हित यासाठी सांगितल्या आहेत.
हेही वाचा – प्रभू श्रीरामाच्या पादुका जाणार विठ्ठलाच्या भेटीला…
4) गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय?
आषाढ पोर्णिमा म्हणजे गुरुपोर्णिमा या दिवशी गुरूंची व व्यासांची पूजा करणे पुण्यदायक असते. सूर्योदयापासून 6 घटी असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी करावी. 6 घटी पेक्षा कमी असता चतुर्दशीच्या दिवशी गुरुपौर्णिमा करावी.
व्यास पूजेबरोबर आपले दीक्षा गुरु ,शिक्षा गुरु,आई वडील व यांचे आपल्यावर संस्कार झाले.त्यांना भेटून वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस.
संत कबीर एका ठिकाणी म्हणतात,”गुरु आणि गोविंद माझ्या ठिकाणी उभे आहेत मी आधी कोणाच्या पाया पडू ” तर मी आधी गुरुच्या पाया पडलो.कारण गुरुनेच मला गोविंदाचे दर्शन घडवले.म्हणून गुरूचं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीत विशेष आहे.
5) या मासातील महत्त्वाच्या पुण्यतिथी
आषाढ कृष्णप्रयोदशीच्या दिवशी संत श्री नामदेव महाराज पुण्यतिथी तसेच आषाढ कृष्ण चतुर्दशीचे दिवशी संत सावता माळी य यांचा पुण्यतिथी चा उत्सव असतो.
6) दीप पूजन
आषाढातील दर्श अमावस्येला दीप पूजन करावे. या दिवशी समई, निरांजन इत्यादी स्वच्छ करून त्याची पूजा करावी आणि दिव्याची प्रार्थना करून दिव्याला नमस्कार करावा. प्रकाश देणाऱ्या दिव्यासाठी प्रकारे कृतज्ञता व्यक्त, करणे म्हणजे दीपपूजन…
तमसो मा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे नेहणारा दिवस.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.