मुंबई । भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता १० जून रोजी मतदान होणार आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर व मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या चारही मतदारसंघासाठी १० जूनला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या या चारही मतदारसंघाच्या आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपणार असल्याने त्याआधी या निवडणुका होत आहेत.
दरम्यान, विधानपरिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
असा आहे निवडणुक कार्यक्रम
१५ ते २२ मे – अर्ज दाखल करण्याची मुदत
२४ मे – अर्जाची छाननी
२७ मे – माघार घेण्याची मुदत
१० जून – मतदान
१३ जून – मतमोजणी
विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ
गेल्या निवडणुकीत मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस हे निवडून आले होते. त्यावेळी एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. विलास पोतनीस यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी निरंजन डावखरे यांनी ही निवडणूक जिंकली.
मुंबई शिक्षक मतदारसंघ
मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यावेळी कपिल पाटील हे निवडून आले होते.
नाशिक शिक्षक मतदारसंघ
नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदीप बेंडसे, भाऊसाहेब कचरे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत किशोर दराडे यांनी बाजी मारली होती.