सांगली । इस्लामपूर प्रीमियर टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेत के.श्रीकांत इलेव्हनने मोहिंदर अमरनाथ इलेव्हनवर १४ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. इस्लामपूर क्रिकेट असोसिएशन तर्फे ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या चार दिवसांत अनेक रोमहर्षक सामने इस्लामपूरकरांना अनुभवायला मिळाले.
शहरातील पोलीस कवायत मैदानावर स्पर्धा सुरू होत्या. १९९० च्या दशकातील शहरातील खेळाडू क्रिकेट लीगमध्ये खेळले. विजेत्या पहिल्या चार संघांना चषक देवून गौरविण्यात आले.
दोन गटात नऊ संघांनी साखळी पध्दतीने सामने खेळले. बाद फेरीत के.श्रीकांत, रवी शास्त्री, सईद किरमानी व अमरनाथ इलेव्हनने प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना के.श्रीकांत इलेव्हनने आठ षटकात ६५ धावा केल्या. यात विशाल कडगावेच्या (२०) धावांचा समावेश होता. प्रतिउत्तरादाखल मोहिंदर अमरनाथ इलेव्हनचा डाव ५१ धावात गुंडाळला.के.श्रीकांत इलेव्हनच्या बाबुराव पाटील व मोहन जाधव यानी भेदक गोलंदाजी केली. अवघ्या ७ धावा देत ३ बळी मिळवणारे बाबुराव पाटील सामनावीर ठरले.
अंतिम सामान्यांपूर्वी रवी शास्त्री इलेव्हन व के.श्रीकांत इलेव्हन यांच्यात उपांत्य लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना के.श्रीकांत संघाने आठ षटकात ६७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रवी शास्त्री इलेव्हनने ५५ धावा केल्या. के.श्रीकांत संघ अंतिम सामन्यात पोहचला.
तर किरमानी इलेव्हन विरुद्ध अमरनाथ इलेव्हन यांच्यातील दुसरी उपांत्य लढत रोमहर्षक झाली. किरमानी संघाने प्रथम फलंदाजी करत ८१ धावा केल्या. यात अमित परीट याने ४६ धावा केल्या. शेवटच्या षटकात १८ धावांची गरज असतांना अमरनाथ इलेव्हनच्या अमोल पाटील याने धुवांधार फलंदाजी केली. ६५ धावा करत एकहाती सामना जिंकून देणारा अमोल पाटील सामनावीर ठरला.
पंच म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कपिल घस्ते,विनोद शिंदे,अष्पाक मुल्ला यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून सुनील गुरव, पंडित कोडग, अरविंद कार्वेकर, अजित गायकवाड, दीपक जाधव यांनी काम पाहिले.संदीप खुडे, प्रशांत पाटील,विक्रम घाडगे, सचिन जोंजाळ, प्रशांत कांबळे, पांडुरंग खैरे यांनी समालोचन केले.
उपविजेता अमरनाथ इलेव्हन
![](https://adhorekhit.com/wp-content/uploads/2023/11/96d084cd-e44d-4e91-99a5-e76ae6a9618a-300x225.jpg)
तृतीय क्रमांक : रवी शास्त्री इलेव्हन
![](https://adhorekhit.com/wp-content/uploads/2023/11/4-300x222.jpg)
चौथा क्रमांक : सईद किरमानी इलेव्हन
स्पर्धेचा निकाल आणि वैयक्तिक बक्षिसे….
इस्लामपूर प्रीमियर टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेचा विजेता : के.श्रीकांत इलेव्हन, उपविजेता : मोहिंदर अमरनाथ इलेव्हन, तिसरा क्रमांक : रवी शास्त्री इलेव्हन, चौथा क्रमांक : सईद किरमानी इलेव्हन.
वैयक्तिक बक्षिसे
मॅन ऑफ द सिरीज – अमित परीट ( किरमानी ) बेस्ट बॅटस् मॅन -अमोल पाटील ( अमरनाथ ) बेस्ट बॉलर मोहन जाधव ( के. श्रीकांत), बेस्ट फिल्डर – विजय पाटील( रवी शास्त्री) फायनल मॅन ऑफ द मॅच- बाबुराव पाटील ( के.श्रीकांत)
पोलीस निरीक्षक संजय हारूगुडे यांच्या हस्ते
बक्षीस वितरण झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे व सागर वरूटे, अमर जंगम उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या मुलांचे सत्कार झाले. सहभागी सर्व खेळाडूंना मेडल देण्यात आली.
इस्लामपूर प्रीमियर टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेत तब्बल १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राज्यभरात स्पर्धेच्या निमित्ताने जुने मित्र भेटल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर दिसला. पोलिसांच्या संघानेही स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस कवायत मैदानावर अनेक वर्षांनी क्रिकेट सामने पहायला मिळाले. क्रिकेट खेळतांना ४० ते ६० वयोगटातील खेळाडूंनी तरुणाईला लाजवले असा खेळ केला.