पुणे । राज्यातील अनेक भागांत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला असताना दुसरीकडे रब्बी पीक पेरणी संकटात आली आहे. आजच्या घडीला फक्त 28 टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतील पर्जन्य तूट, भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र व इतर निकष लक्षात घेऊन राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने यंदाच्या हंगामासाठी 178 तालुक्यांतील 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी यंदाच्या रब्बी हंगामाची पीक पेरणी व पीक परिस्थितीचा साप्ताहिक अहवाल तयार केला आहे.त्यानुसार या कालावधीत आकाश अंशतः ढगाळ होते. कोकण, पुणे, कोल्हापूर विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र 53 लाख 97 हजार हेक्टर असून फक्त 05.11 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 28 टक्के पेरणी झाली आहे. रब्बी हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ज्वारी, हरभरा, गहू, मका व करडई पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. पेरलेली पिके उगवण ते रोप अवस्थेत आहेत. मागील आठवडय़ात झालेला पाऊस रब्बी पिकांना लाभदायक ठरेल. पुणे विभागात मक्यावर लष्करी अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भा दिसून आल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.
मान्सूनच्या काळात खरीप हंगामही धोक्यात आला होता. पावसाने ओढ दिल्याने दुबार पीक पेरणीचे संकट शेतकऱयांसमोर निर्माण झाले होते. पावसाअभावी पेरणीही झालेली नव्हती. त्यानंतर आता रब्बीचा हंगाम संकटात आला आहे.