सांगली । इस्लामपूर येथील सातत्याने सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम राबवत असलेल्या माणुसकीच नातं प्रतिष्ठानच्यावतीने यंदाची दिवाळी दिव्यांगांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.शहर व परिसरातील 125 हून अधिक गरजू दिव्यांगांना दिवाळीनिमित्त अन्नधान्य व फराळाला लागणाऱ्या साहित्याचे किट देण्यात आले.
या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी 1 मे रोजी महा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. गतवर्षी एका दिवसात 914 जणांनी रक्तदान केले होते. त्याचबरोबर मरणोत्तर नेत्रदान संकल्प पत्र, माणुसकीच नातं मोफत अभ्यासिका, दिव्यांगांना व गरजूंना सहाय्य; असे अनेक उपक्रम या प्रतिष्ठान मार्फत केवळ सदस्यांच्या पाठबळामुळे वर्षभर राबविले जात असतात.आपण आपली दिवाळी कुटुंबीयांसमवेत साजरी करताना काही खर्च करत असतोच…परंतु आपल्या बरोबर इतरांच्या, दिव्यांगांच्या आयुष्यातील दुःख.. वेदना यांना काहीसा आधार देण्याचा प्रयत्न देखील यानिमित्ताने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील माणुसकीचं नातं प्रतिष्ठानने केला आहे.
या परिवाराच्या सोशल मीडिया ग्रुप वर एखाद्या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर कोणीही,कोणाला एकही कॉल न करता नियोजित असणाऱ्या निधीपेक्षा अधिक निधी त्वरित संकलित होत असतो हे या परिवाराचे वैशिष्ट्य आहे.या प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या उत्स्फूर्त मदतीच्या बळावर सातत्याने असे विविध उपक्रम राबविले जातात.त्यामधूनच आपण यावर्षीच्या दिवाळी किटमध्ये साखर,गोडेतेल ,रवा, मोती साबण,उटणे चिवड्याचे पोहे,चिवडा मसाला,अलमंडचं ऑइल,खोबरे; असे दिवाळी निमित्त काही साहित्य किट दिव्यांगांना दिले. एकूण दिव्यांगांची माहिती संकलन करून त्यामधील निवडक गरजू अशा 125 हुन अधिक दिव्यांगांना दिवाळीच्या आधीही किट सुपूर्त करण्यात आली.
राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील,पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे, सचिव प्राचार्य महेश जोशी,प्रा.डॉ. बी.पी.पाटील यांच्यासह कार्यकारिणीचे प्रमुख सदस्य आणि मान्यवरांच्या हस्ते ठिकठिकाणी अशी कीट वाटप करण्यात आली. उपाध्यक्ष उमेश कुरळपकर, कार्यकारणी सदस्य संपत वारके, दीपक कोठावळे, विकास राजमाने, एड. विजय काईंगडे, श्रीकृष्ण पाटील, सतीश सूर्यवंशी,डॉ. विक्रांत पाटील आदींचीही उपस्थिती होती.