पुणे । मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे.त्यानुसार राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्याच्या धर्तीवर विशेष कक्ष स्थापन स्थापन करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जी संस्थाने होती,त्या संस्थांनांकडून ज्या अभिलेखात ‘कुणबी’ जातीच्या नोंदी आढळून येतील असे कायदेशीर अभिलेख उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
ही कागदपत्रे तपासण्यात येणार
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ विविध प्रकारच कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत.खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना नं. ०१ हक्क नोंद पत्रक, नमुना नं. ०२ हक्क नोंद पत्रक आणि सातबारा उतारा हे महसुली अभिलेखे तपासण्यात येणार आहे.(‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
जन्म-मृत्यू नोंदी रजिस्टर (गाव नमुना १४), शैक्षणिक अभिलेख्यामध्ये प्रवेश निर्गम नोंदवही/जनरल रजिस्टर, रेल्वे पोलीस विभागाकडील गुन्ह्याबाबतच्या नोंदी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडील माजी सैनिक निवृत्तीनंतर नोंदणीकरिता करण्यात आलेली कागदपत्रे, जिल्हा वक्फ अधिकारी यांचेकडील मुंतखब, १९६७ पूर्वीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक, महानगरपालिका आणि नगरपालिकेकडील शेतवार तक्ता वसूल व आमदनी नोंदवही आणि सैन्य भरती कार्यालयाकडील सैन्य भरतीच्यावेळी घेतलेल्या नोंदी तपासण्यात येतील.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचेकडील अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही आणि आस्थापना कागदपत्रे, तर कारागृह अधीक्षकांकडील कच्चे आणि गुन्हे सिद्ध झालेल्या कैद्यांच्या नोंदवह्या, पोलीस विभागाकडील गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर रजिस्टर तपासण्यात येईल.(‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडील खरेदीखत नोंदणी केलेले रजिस्टर, डे-बुक, करार खत, साठेखत, इसारा पावती, भाडे चिठ्ठी, ठोके पत्र, बटाई पत्र, दत्तक विधान, मृत्युपत्र, इच्छापत्र, तडजोड पत्र व इतर दस्त तपासण्यात येतील. भूमी अभिलेख विभागाकडील पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रतिबुक, रिव्हीजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर, हक्क नोंदणी पत्रक, नमुना-३३ , नमुना-३४ आणि टिपण बुक तपासण्यात येणार आहेत.
शोधण्यात आलेली जुनी कागदपत्रे (मोडी / ऊर्दू / फारसी इ.) संबंधित भाषा तज्ञांकडून भाषांतरित करुन, डिजिटलाईजेशन तसेच प्रमाणिकरण करुन संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत सूचित करण्यात आले.