सांगली । ऊसदर प्रश्नी मंगळवारी रात्री बहे येथे दोन ठिकाणी स्वाभिमानी व बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले.तर त्यातील काही ट्रॅक्टरची हवा सोडली.त्याचवेळी कारखान्याचे सुरक्षारक्षक व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीही झाली.यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गत हंगामातील ४०० रुपये द्या आणि चालू गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करा आणि मगच ऊस वाहतूक करा असा इशारा दिला.
बहे येथील बहे हायस्कुल परिसरात ऊस दर आंदोलनाची ठिणगी पडली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील व बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे व कार्यकर्त्यांनी कृष्णा कारखान्याकडे जाणारे उसाने भरलेले दहा ते पंधरा ट्रॅक्टर मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास रोखले.काही ट्रॅक्टरमधील हवा सोडली.यावेळी कारखान्याचे सुरक्षारक्षक व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.
हेही वाचा – ‘स्वाभिमानी’ आक्रमक : ट्रॅक्टर टायरमधील हवा सोडली; वाहतूक रोखली…गट ऑफिसला ठोकले टाळे
यावेळी कारखान्याचे सुरक्षारक्षक व प्रशासनाला भिक न घालता हातात ऊसाचे दांडके हातात घेऊन जाब विचारला.जोपर्यंत ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत एकही ऊसाचा ट्रॅक्टर फिरुन देणार नाही,होणाऱ्या नुकसानी सर्वस्वी कारखाना व महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा इशारा शहाजी पाटील व गणेश शेवाळे यांनी दिला.यावेळी बहुसंख्य शेतकरी,युवा वर्ग रस्त्यावरती आला होता.ट्रॅक्टरच्या पुढे गाड्या लावून रस्ता रोको करण्यात आला.त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते.हा रात्रीचा ‘रस्ता रोको’चा प्रकार बघून ग्रामस्थ रस्त्यावर आले होते.
तत्पूर्वी सायंकाळी सातच्या सुमारास स्वाभिमानीचे शहाजी पाटील,प्रवीण पाटील व सर्जेराव पाटील आदी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बहे ग्रामपंचायतजवळ ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून धरले.आधी गत हंगामातील ४०० रुपये द्या आणि चालू गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करा असा इशारा शहाजी पाटील,प्रवीण पाटील व सर्जेराव पाटील यांनी दिला.