वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा आठव्यांदा झाला पराभव
रोहितची कप्तानी,सिराज-कुलदीपची अप्रतिम गोलंदाजी…बुमराहची कमाल
कर्णधार रोहित-श्रेयस अय्यरचे अर्धशतक
India Vs Pakistan Highlights : विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला.रोमांचक सामन्याची अपेक्षा असताना यजमान भारतीय संघाने पाकिस्तानला या सामन्यात डोके वर काढू दिले नाही.कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय पूर्ण केले.तसेच पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आपली विजयाची परंपरा कायम राखली.
अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत आज भारतीय संघाने परंपरागत शत्रूत्वाचा इतिहास कायम राखत पाकिस्तानचा सात गडी राखून (अवघ्या 30.3 षटकात) अतिशय लाजिरवाणा पराभव केला.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला.प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावत 192 धावा करून सामना जिंकला.टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे.भारताचा हा आठवा विजय आहे.आता या स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्ध पराभव झालेला नाही.
पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र,रोहित फटकेबाजी करत असतानाच शाहीन आफ्रिदीने भारताला शुभमन गिलच्या रूपाने पहिला धक्का दिला.त्याने गिलला 16 धावांवर बाद केले.त्यानंतर आलेला विराट कोहली देखील 16 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला हसन अलीने बाद केले. मात्र रोहित शर्माने एका बाजूने दमदार फलंदाजी करत भारताला शतकाजवळ पोहचवले होते.त्याने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
दरम्यान,यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र,शाहीन आफ्रिदीने रोहितला माघारी धाडले.त्याने 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली.त्यानंतर श्रेयस अय्यर आणि के.एल राहुल यांनी धावसंख्या पुढे सरकवत भारताला विजय मिळवून दिला.अय्यरने 62 चेंडूमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 53 धावांची खेळी केली. केएल राहुल याने दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 19 धावांचे योगदान दिले.
त्याआधी,पाकिस्तानला इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी आठ षटकात 41 धावांची सलामी दिली. शफीकला सिराजने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. इमाम याने 36 धावांचे योगदान दिले. त्यानंतर कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिजवान यांनी 78 धावांची भागीदारी केली. बाबर अर्धशतक करून बाद झाला. बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानची अवस्था तीन बाद 155 अशी होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपला फास आवळला आणि पाकिस्तानला 191 धावांवर सर्वबाद केले. भारतीय संघासाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. बुमराह, सिराज, हार्दिक, कुलदीप व जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
उद्या इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्ली येथे सामना खेळला जाईल.