बीआरएस व शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांची घोषणा
अबकी बार किसान सरकार आणण्याचा राज्यातील शेतकऱ्यांनी केला निर्धार
सांगली / विनोद मोहिते
महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांवर टाचा घासून मरायची वेळ आली आहे. हे रोखण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यासोबत गेलो आहोत. शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या बीआरएसच्या माध्यमातून राज्यभर ऊस दरासाठी आंदोलन छेडणार असल्याची घोषणा बीआरएस व शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली. भारतात अबकी बार किसान सरकार आणण्याचा निर्धार राज्यातील शेतकऱ्यांनी यावेळी केला.
इस्लामपूर येथे पेठ सांगली रस्त्यावरील ख्रिश्चन बंगला परिसरात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव विधानसभा अधिवेशामुळे अनुपस्थित होते. त्यांच्या वतीने त्यांचे पुतणे व महाराष्ट्र प्रभारी श्री.के.वामशीधर राव यांनी सन्मान स्वीकारला.
रघुनाथ पाटील म्हणाले,” गेल्या ७५ वर्षातील आमदार खासदारांनी राबवलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्येचा कलंक लागला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसला तो तर शेतकऱ्यांचा मृत महोत्सवचं आहे अशी विदारक परिस्थिती आहे. शेतकरी विविध नैसर्गिक संकटात सापडत आहे. यात शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे तर दुसरीकडे राज्यकर्त्यांची चुकीची धोरणे शेतकऱ्यांना मारक ठरत आहेत. तेलंगणा राज्यात सरसकट शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये दिले जाते. वीज, पाणी मोफत आहे. आणि आमच्या महाराष्ट्रात मात्र घोषणा केलेले अनुदान,मदत ही शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकरी नेते शरद जोशींनी सुचवलेल्या तर प्लॅनची तंतोतंत अंमलबजावणी तेलंगणा राज्यातील सरकार करत आहे.”
ते म्हणाले,” शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तेलंगणा प्रमाणे एकरी दहा हजार रुपये मदत करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारला शिफारस केली गेली होती मात्र ही शिफारस सरकारने धुडकावली आहे.”
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट म्हणाले,” बीआरएस रुपी गुलाबी झंझावात घराघरात न्या. शेतकऱ्यांची ताकद दाखवा.”
शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अँड.अजित काळे,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, बीआरएसचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक बी.जे देशमुख,माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची भाषणे झाली.जिल्हा समन्वयक बी.जी.पाटील यांनी प्रास्ताविक केले.राज्य महिला संघटक शर्वरी पवार यांनी आभार मानले.
महाराष्ट्रात आंदोलने व मेळावे होणार
आत्महत्यांचा कलंंक पुसण्यासाठी श्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली भारतात अबकी बार किसान सरकार आणण्याचा निर्धार राज्यातील शेतकऱ्यांनी मेळाव्यात केला. भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आंदोलने व मेळावे घ्यायचे ठरले.१५ ऑगस्ट नंतर पंढरपूर येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळावा घेणे आणि ३ सप्टेंबर रोजी शरद जोशी यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद येथे मांजरा खोऱ्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणे.२ ऑक्टोबर गांधी जयंती पासून पुण्याच्या साखर आयुक्त कार्यलया समोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करणे.
दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी व गुजरात प्रमाणे ऊसाला ५ हजार रुपये दर मिळावा यासाठी हे बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली.
आम्हाला साथ द्या : महाराष्ट्र प्रभारी श्री.के.वामशीधर राव
महाराष्ट्र प्रभारी श्री.के.वामशीधर राव म्हणाले,” तेलंगणा राज्यात आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना राबवून त्याद्वारे शेतीला मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. शेतीची खरेदी-विक्रीचे व्यवहार डिजिटलायझेशन केल्याने फसवणूकीचे प्रकार होत नाहीत. शेतकऱ्यांना नैसर्गिक व अपघाती मृत्यूच्या विम्यासाठी पाच लाख रुपये दिले जात आहेत. यासह विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजना महाराष्ट्रात राबवण्यासाठी आम्हाला साथ द्या.”