कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्याचे विचारदूत म्हणून वावरलेल्या बॅ. पी.जी.पाटील यांच्या जयंतीनिमित्त…
बॅ. पी.जी.पाटील सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावचे.ते पी.जी. सर म्हणून सर्वपरिचित होते.सरांचे व्यक्तिमत्व म्हणजे वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांचे विलिंग्डन महाविद्यालयातील गुरू व्ही.के.गोकाक त्यांना पी.जी.म्हणत हेच नाव पुढे रूढ झाले.
3 जुलै हा त्यांचा जन्मदिवस घरी मुलगा व्हावा यासाठी त्यांच्या आजी आऊबाई पंढरपूरला 110 मैल चालत गेल्या म्हणून त्यांचे नाव पांडुरंग ठेवले. आईच्या मृत्यूनंतर आईच्या आई, साऊबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. कवलापूर येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांनी सहावीत असताना ‘बालतरंग’ हे हस्तलिखित मासिक तयार केले. कवलापूरतील अंतापाण्णा मुळे यांच्या दुकानात कर्मवीर अण्णा व बॅ. पी.जी. यांची पहिली भेट झाली. अण्णांनी त्यांना शिक्षणासाठी सातारला नेले. 1940 ला सर्व विषयात डिस्टिंकशन मिळवून ते उत्तीर्ण झाले. संस्कृत विषयासाठी राजरत्न माने पाटील हे पारितोषिक मिळाले.
विलिंग्डन महाविद्यालयात इंटर परीक्षेत ते विद्यापीठात पाहिले आले. या काळात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. झेंडावंदन, देशभक्तीपर गाण्यांचे गायन, गुप्त माहिती पत्रकांचे वाटप, ब्रिटिशांविरोधात घोषणा, वर्गावर बहिष्कार अशा प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली.
पी.जी. सर 23 सप्टेंबर ते 26 जानेवारी 1942 या कालावधीत येरवडा कारागृहात सातारा जिल्ह्यातील राजबंध्याच्या बराकीत होते. तिथे ते सहकाऱ्यांना Times of India वाचून दाखवीत.1945 ला बी. ए. परीक्षेत इंग्रजी विषयात ते मुंबई विद्यापीठात पहिले आले. त्यांना अण्णांनी Bar at Law या पदवीसाठी पाठवले. या काळात वसंतदादांनी त्यांना 3 हजार रुपये मदत दिली. लंडनला जाण्यापूर्वी त्यांची महात्मा गांधीशी पाचगणी येथे भेट झाली. आपण शिक्षक होणार असल्याचे सांगितले. 1952 ला बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले. 1954 ला एम.ए. (इंग्रजी) या परीक्षेत पी.जी. सर पुणे विद्यापीठात पहिले आले तर पत्नी सुमतीबाई यांचा दुसरा क्रमांक आला.
शिवाजी कॉलेज सातारा, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, शाहू कॉलेज कोल्हापूर येथे त्यांनी प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम पाहिले, महाविद्यालयांसाठी आकर्षक ब्रीदवाक्य तयार करण्यात ते वाकबगार होते. शिवाजी महाविद्यालयातील अण्णांच्या अर्ध पुतळ्याखाली, work is worship (श्रम हीच पुजा) असे लिहले. सदगुरु गाडगे महाराज कॉलेजसाठी ‘Be and bear’ ‘Do and dare’ हे ब्रीदवाक्य घेतले. कोल्हापुरातील पूर्वीचे किर्ती आताच्या शाहू महाविद्यालयांसाठी ‘Let your light shine’ हे बोध वाक्य दिले. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य अशी पदे त्यांनी भूषवली. कुलगुरू पदाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रवासभत्ता घेतला नाही. 82 ला त्यांना मिळालेला 1,11,111 रुपयांचा निधी त्यांनी शिवाजी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा केंद्राला दिला. बहुतेक सर्व संपत्ती ‘रयत’ ला दान केली.
पी.जी. सर हे उत्तम लेखक आणि प्रभावी जनसंवादी वक्ते होते. त्यांनी ‘शिलेदार’ या टोपण नावाने काव्यलेखन केले. ‘कर्मवीर गीतांजली’ प्रकाशित केली. अण्णांच्या आठवणींचा संग्रह 1964 ला कर्मविरोपनिषिद या नावाने प्रकाशित केला. त्यांचे ‘रयत’ मधील सहकारी आणि जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. अण्णांचे पाहिले इंग्रजी चरित्र ए. व्ही. मॅथ्यू यांनी लिहिले. तर पी.जी. सरांनी ‘The Bountiful Banyan’ हे अण्णांचे इंग्रजी चरित्र चार खंडात लिहले. अण्णांच्या सहवासात तीस वर्षे राहण्याची संधी मिळाल्यामुळे हे इंग्रजी चरित्र वाचनीय बनले आहे.
सत्यशोधक चळवळ, गांधीयुग, अण्णांची जडणघडण, अण्णांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाची मांडणी यासाठी हे इंग्रजी चरित्र अत्यंत मोलाचे ठरले आहे. The Bountiful Banyan हे एक प्रकारे आत्मचरित्रात्मक चरित्र आहे. उत्तम इंग्रजी गद्य लेखन हे या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. या इंग्रजी चरित्रामुळे अण्णांच्या विचारांचे राजदूत असलेल्या पी.जी. सरांनी अण्णांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचे भाष्यकरार म्हणून लौकिक मिळवला. या चरित्राचा शेवट करताना पी.जी. सरांनी कर्मवीर अण्णा हे तिसऱ्या जगातील महान शिक्षण तज्ञ होत असे म्हटले आहे.
पी.जी. सर हे ग्रामीण ढंगात बोलणारे प्रभावी जनसंवादी वक्ते होते. दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि दिवाळी भाऊबिजेला त्यांचे कवलापूरात व्याख्यान होत असे. ते स्वतःची पदवी एस.डी. एफ म्हणजे सातारा डिस्ट्रिकट फाकडू अशी सांगत. ते प्रबोधनाच वार होऊन राज्यभर फिरत राहिले. स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास हे वक्त्याचे गुण त्यांच्या ठायी होते. खादीचा पेहराव आणि कोट परिधान करून. छोट्या चणीचे पी.जी.सर ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत. ते आपल्या ग्रामीण ढंगाच्या विनोदी भाषणात डेमॉस्थेनिसचा आवर्जून उल्लेख करीत.ते म्हणत डेमॉस्थेनिसला कुणीतरी विचारलं की,’भाषणाचा पहिला गुण कोणता?’ तो म्हणाला की,’नाट्य’,भाषणाचा दुसरा,तिसरा आणि अखेरचा गुणदेखील नाट्य,असे त्याचे उत्तर होते.
पुढे बॅ. पाटील म्हणायचे की गोवळकोंड्याच्या कुतुबशहाच्या दरबारात बादशाह शिवाजी महाराजांना म्हणाला की,तुमचे सैनिक छोट्या चणीचे आहेत. तुमच्याकडे हत्तीदळ नाही.हे सैन्य लढणार कसे? महाराजांनी ‘माझा प्रत्येक मावळा हा हत्तीबरोबर लढायला तयार आहे’,असे सांगितल्यावर येसाजी कंक हत्ती बरोबर लढला.येसाजी कंकाने हत्तीची सोंड कापून टाकली.बादशहाने देऊ केलेली पंच हजारी मनसबदारी त्याने नाकारली.’तुमच्या मनसबदारीपेक्षा महाराजांनी दिलेलं मानाचं कड मला महत्वाच वाटत’,हे येसाजी कंकाचे उत्तर आजही महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे आहे.इतिहासातला हा प्रसंग इंग्रजीत शिकवताना शिकवणाऱ्या शिक्षकाला भाषणात नाट्य हवे,या डेमॉस्थेनिसच्या वाक्याची आठवण झाली आणि हा शिक्षक वर्गात म्हणाला की, ‘येसाजी कंक वेन्ट टू द मैदान.हत्ती अल्सो वेन्ट टू द मैदान. बोथ ऑफ देम डॅशड इच आदर.येसाजी कंक मार्ड अन उडी ऑन दी गंडस्थळ ऑफ हत्ती.ही अटॅकड दि सोंड ऑफ दि हत्ती.द सोंड वॉज कट अवे इन टू टू पार्ट्स अँड हत्ती वेन्ट मेकिंग द नॉईज ची…ची…इन द कॉर्नर., बॅ. पी.जी. पाटील यांनी साभिनय सादर केलेल्या या डेमॉस्थेनिसच्या उक्तीवरील आधारित किस्याला श्रोते मनापासून दाद द्यायचे.
संदर्भ :-
1) ‘रयतपुत्र, बॅ. पी.जी.पाटील’ – प्राचार्य डॉ. विजयराव नलवडे
2) ज्ञानयोगी बॅ. पी.जी.पाटील, संपादक, प्राचार्य रा.तु. भगत
3)’ उदयंती’ संपादक, डॉ. शिवराम माळी
4) ‘त्रिदल’ – संपादक, प्राचार्य एम. ए.शेख
5) बॅ. पी.जी. पाटील यांचे जीवनकार्य, प्रा. संतोष जाधव यांचा शोधनिबंध.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर