गेल्या काही दिवसांत तापमान वाढत आहे. जिल्ह्यात पारा ३९ अंशांवर गेला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्याच्या विविध तक्रारी जाणवतात.जागतिक हवामान बदलामुळे उष्ण लहरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.उष्ण लहरींच्या वाढत्या प्रभावाने मनुष्यजातीचे शारीरिक,मानसिक,आर्थिक अशा विविध पद्धतीने नुकसान होताना दिसत आहे.यासाठी शेतमजूर,कामगार तसेच सामान्य जनता यांना उष्माघाताविषयी अधिक माहिती असणे गरजेचे आहे.यासाठी आपण खालील बाबी आवश्य वाचा.
उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात आणि उष्मापात असे दोन प्रकार आहेत. सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघातशरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो.उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे.उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असेही म्हणून शकता.रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यामुळे किंवा जास्तवेळ उन्हात थांबल्यामुळे शारिरातील उष्णता संतूलन संस्था नाकाम होते.
उष्माघात कोणाला होऊ शकतो
उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं,वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक,दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो.तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार,मूत्रपिंडाचे आजार,लठ्ठपणा उच्च रक्तदाब,मधुमेह,मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो.
उष्माघात होण्याची कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
- जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
- घट्ट कपड्याचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे
- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
- भूक न लागणे,चक्कर येणे,निरुत्साही होणे,डोके दुखणे
- रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी
उपचार
🌑 रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे.खोलीत पंखे,कुलर ठेवावेत.
🌑 शक्य असल्यास रुग्णास वातानुकूलीत खोलीत ठेवावे.
🌑 रुग्णाचे तपमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
🌑 रुग्णास बर्फाच्या किंवा थंड पाण्याने अंघोळ घालावी
🌑 रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात,
🌑 सलाईन देणे.शक्य असल्यास रुग्णाच्या कडेने बर्फाचे तुकडे ठेवावेत.
प्रतिबंधात्मक उपाय
✪ वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.
✪ कष्टाची कामे सकाळी लवकर आणि संध्याकाळी कमी तापमानात असताना करावीत.
✪ उष्णता शोषुन घेणारे कपडे (काळे किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत.सैल,पांढऱ्या रंगाचे कापड वापरावेत.
✪ जलसंजीवनीचा वापर करावा.पाणी,सरबत,द्रव पदार्थ भरपुर प्यावे.
✪ उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
✪ उन्हात बाहेर जाताना गॉगल,डोक्यावर टोपी,टॉवेल,उपरणे याचा वापर करावा.
✪ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करणारे चहा, कॉफी, महाव कार्बनिटेड थंड पेय टाळावेत.