दुर्मिळ वनस्पतींचे उद्यान; फुलपाखरू उद्यान हे प्रमुख आकर्षण
सातारा । कराड-वाळवा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालयाचे ‘जयवंत बोटॅनिकल गार्डन’ हे दुर्मिळ वनस्पतींचे उद्यान सुमारे तीन एकर परिसरामध्ये तयार करण्यात आले आहे.पश्चिम घाटांमधील दुर्मिळ व प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे संवर्धन व संगोपन करण्यात आले आहे.विविध प्रकारच्या सुमारे २०० वनस्पती उद्यानामध्ये वाढवण्यात आल्या आहेत.सेंचुरी पाम,चांदकोता,सप्तरंगी,धूप,चेर,जायंट बांबू,गारंबीचा वेल अशा अनेक दुर्मिळ वनस्पती उद्यानामध्ये आहेत.फुलपाखरू उद्यान हे गार्डनचे प्रमुख आकर्षण आहे.
कराड व वाळवा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कृष्णा महाविद्यालयाच्या ‘जयवंत बोटॅनिकल गार्डन’मध्ये दुर्मिळ तसेच वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या सुमारे २०० वनस्पतींचे संकलन व संवर्धन करण्यात आलेले आहे.केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय,नवी दिल्ली यांच्याकडून २००३ साली पश्चिम घाटातील दुर्मिळ व प्रदेशनिष्ठ गवतांच्या प्रजातींचे संकलन व संवर्धन करण्यासाठी सात लाख रुपये विशेष अनुदान मंजूर झालेले होते.या अनुदानातून या उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे.कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार आदरणीय स्व.जयवंतराव भोसले यांचे निसर्गप्रेम व अतुलनीय शैक्षणिक कार्य याचे कायमस्वरूपी स्मारक म्हणून उद्यानाचे ‘जयवंत बोटॅनिकल गार्डन’ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
सुमारे तीन एकर क्षेत्र असणाऱ्या उद्यानांमध्ये अर्बोरटम,पाम्याटम, हर्बल गार्डन, बटरफ्लाय गार्डन,ग्रासेस,सायक्याडस,बांबूसेटम,रॉकरी असे वनस्पतींचे विविध विभाग तयार करण्यात आलेले असून त्यानुसार वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत.
पाम या नारळ कुळातील वनस्पतींच्या सुमारे २४ प्रजाती उद्यानांमध्ये असून यामध्ये वेत,ऑईल पाम,बिस्मार्किया,शँपेन पाम या व इतर शोभिवंत प्रजाती वाढविण्यात आलेल्या आहेत.गवतांच्या सुमारे ३० प्रजाती असून बांबूच्या १४ प्रजातींचे संवर्धन करण्यात आलेले आहे.पश्चिम घाटामध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ व प्रदेशनिष्ठ असणाऱ्या सुमारे २० वृक्षांच्या प्रजातींचा समावेश आहे.पाण्यातील वनस्पती वाढविण्यासाठी तळे तयार करण्यात आलेले असून यामध्ये कमळाचे विविध प्रकार लावण्यात आलेले आहेत.
सुमारे ४० ते ८० वर्षापर्यंत जगणारा व जगातील सर्वात लांब फुलांचे तुरे येणारा सेंचुरी पाम,सुमारे दोन मीटर पर्यंत लांब शेंग असणारा महाकाय गारंबीचा वेल, रावण ताड म्हणून ओळखला जाणारा अत्यंत दुर्मिळ पाम,सीतेचा अशोक,चांदकोता, गोरखचिंच,नरक्या,पाडळ, दर्भ या दुर्मिळ तसेच वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या वनस्पती वाढविण्यात आलेल्या आहेत.गुगुळ, बेडकी,अनंतमूळ,भारंगी,चित्रक,मुरडशेंग,पांढरी गुंज,ज्योतिष्मती,दंती,सर्पगंधा,वायवर्णा,मोहा,अग्निमंथ,
जीतसाया अशा दुर्मिळ तसेच अत्यंत उपयोगी असणाऱ्या ११० औषधी वनस्पतींचे उद्यानांमध्ये संवर्धन करण्यात आलेले आहे
वनस्पतींचे अभ्यासक तसेच फार्मसी,आयुर्वेद,पर्यावरण शास्त्र,वनविभाग,पर्यावरण प्रेमी यांनी अभ्यासासाठी उद्यानास भेट द्यावी तसेच शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी निसर्ग संरक्षण व दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन याविषयी उद्यानांमध्ये राबविलेल्या उपक्रमांची माहिती उद्यानास भेट देऊन घ्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ.सी.बी.साळुंखे यांनी केले आहे
जयवंत बोटॅनिकल गार्डन तर्फे ग्रीन कॅम्पस,एज्युकेशनल गार्डन तयार करण्यासाठी गार्डन लँडस्केपिंग व वनस्पतींचे नमुने ओळखण्यासाठी प्लांट ऑथेंटिकेशन या विषयांमध्ये कन्सल्टन्सी सुरू असून संबंधित व्यक्ती व संस्थांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.सी.बी.साळुंखे (मोबाईल ९८ २२ ६० ९३ ९५) यांनी केले आहे.