पालकांचा गाफीलपणा ठरतोय जीवघेणा…
जनजागृती आणि प्रबोधनासाठी मुक्तांगण स्कूलचा अनोखा उपक्रम..!
सांगली ।
जनजागृती आणि पालकांच्या प्रबोधनासाठी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने मुक्तांगण प्ले स्कूलच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. व्हॅलेंटाईनडेच्या निमित्ताने अनेक जण प्रेम व्यक्त करताना दिसतात.
पालकांनो ; मुलांवर प्रेम करा.. पण दुर्लक्ष करू नका असा संदेश दिला गेला.
इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारती जवळ असणाऱ्या मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये अनुभवातून आणि खेळातून सहज शिक्षण दिले जाते.पालकांच्या अजाणते पणामुळे आणि दुर्लक्षामुळे अनेक दुर्घटना होतात.त्या मुलांच्या जीवावर बेततात असे अनेक प्रकार समोर येत आहेत.यातून धडा घेण्यासाठी चिमुकल्या वयातच मुलांना जाणीव करून देण्यासाठी मुक्तांगण स्कूलच्या वतीने प्रत्यक्षात अनुभव देत जाणीवजागृती केली.
मागील आठवड्यात मिरज येथे दुर्दैवी घटनेत पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता.तर कोल्हापूर जिल्ह्यात नऊ महिन्यांचे बाळ वॉकर वरून पिठाच्या बुट्टीत पडून गुदमरून मृत झाले होते.चॉकलेट घशात अडकले,पाण्यात पडून मृत,जिन्यावरून पडून, वाहन पुढे-मागे घेताना, दूध पिताना ठसका लागून, गरम पाणी,तेल, साखरेचा पाक अगांवर सांडून मृत, दुचाकी, चारचाकीची किल्ली चालू करून, सायकलीच्या चाकात पाय अडकून दुर्घटना घडल्या आहेत. कोण-कोणत्या दक्षता घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करताना छोट्या छोट्या कृती करून दाखवण्यात आल्या.
पालकांची अनावधानाने घाई गडबडीत झालेली चूक जशी जीवावर बेतते तसेच मुलांकडून पण अशा चूक घडत आहेत. दुचाकी अचानक सुरू करणे, वाकून पाहणे, वस्तू गिळणे, विजेच्या स्विच मध्ये पेन,पेन्सिल घालणे, झोपाळा खेळताना फास लागणे,धारधार वस्तू कापणे असे प्रकार घडतात.
अनेकदा सोशल मीडियावर याचे व्हीडिओ येतात.या सर्व घटना- दुर्घटना याबाबतीत मुलांना माहिती देण्यात आली.दुर्घटना घडून गेल्यावर पालक हळहळ व्यक्त करतात. मात्र याबाबत प्रबोधन करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देत सुरक्षितता कशी ठेवली पाहिजे याबाबत उपक्रम राबवले गेले.
संचालिका सौ वर्षाराणी मोहिते म्हणाल्या ,” मुलांची निरीक्षण क्षमता चांगली असते.मुलं अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे काय करावे पेक्षा काय करू नये हे मुले लक्षात ठेवतात. पण सतत वेगवेगळ्या छोट्या छोट्या कृतीतून मुलांना त्याचे गांभीर्य लक्षात आणून दिले जाते. मुलाचे प्रबोधन आम्ही वर्षभरात करतो.घटना घडून गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा दुर्घटना होऊच नये यासाठी पालकांनी विचार करायला हवा. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाचे व्हीडिओ आम्ही पालकाना शेअर करीत आहोत.”