कारवाई कोणतीही असो…त्याची चर्चा ही ठरलेली असतेच.मग ती दबक्या आवाजात असेना ! अशा कारवाईच्यावेळी घडलेले किस्से लोकं कुजबुजताना दिसतात.कारवाईच्यावेळी धाड टाकायला आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवर प्रसंगी दबाव टाकण्याचे प्रकारही घडत असतात.काही ठिकाणी कारवाईला प्रतिकारही केला जातो.तर गावात पथक आल्याची कानकुण लागताच काहीजण घराला कुलूप लावून गायब होताना दिसत आहे.असे एक ना अनेक किस्से ऐकायला मिळत असतात.संबंधित पथकाने केलेला दंड कमी करण्यासाठी काहींची ‘धावपळ’ तर काहींची दंड रद्द व्हावा यासाठी ‘धडपड’ बघण्यासारखी असते.त्यासाठी नेत्यांच्या मागे ‘पळापळ’ सुरू असते.
मध्यंतरी कृष्णा काठाच्या एका गावात अफलातून किस्सा घडला.त्याची कुजबुज आजही सुरु आहे.त्याचे असे झाले : एका शासकीय विभागाचे पथक एका खेडेगावात पोहचले.ते थेट एका पुढाऱ्याच्या घरात शिरले.अचानक या पथकाची एंट्री होताच हे महाशय तसे गडबडले.त्यांना कळायचेच बंद झाले.काय करायचे हेच सुचेना.त्यातूनही त्यांनी स्वतःला सावरत साहेबांना फोन लावतो…थांबा ! असे त्या अधिकाऱ्यांना म्हणाले.त्याचबरोबर कारवाईसाठी आलेल्या एका महिला अधिकाऱ्यांने साहेबांना फोन लावू नका असे शांतपणे संबंधित त्या पुढारी ग्राहकाला सांगितले.फोन लावू नका असे अधिकाऱ्याने म्हणताच त्या ग्राहकाला वाटले आता जमले.तसा सुटकेचा निःश्वास टाकणार एवढ्यात त्या महिला अधिकाऱ्याने मोदी साहेबांचा नंबर आहे का अशी विचारणा त्या ग्राहकाकडे केली.आणि साहेबांना कशाला थेट मोदी साहेबांनाच फोन लावा असे सुनावताच संबंधित ग्राहकाची बोलतीच बंद झाली.(साहेबांचे नाव घेतल्यावर कारवाई थांबेल असे त्या ग्राहकाला वाटले.पण,मॅडमना माहित होते की पंतप्रधानांचे नाव घेतल्यावर तो ग्राहक काय त्यांना फोन लावणार नाही) शेवटी काय तर केलेला दंड गपगुमान भरावा लागला.हा किस्सा सध्या ग्रामीण भागात भलताच चर्चेत आहे.