स्थावर मालमत्ता खरेदी करत असताना हल्ली खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे झालेले आहे.एकच स्थावर मालमत्ता अनेक लोकांना वेगवेगळया दिवशी विक्री करून फसवणूक झालेले बरेच प्रकार सध्या निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने स्थावर मालमत्ता खरेदी घेत असताना कोणत्या बाबी तपासणे आवश्यक आहे.
याबाबत थोडक्यात माहीती
🌑 खरेदी घ्यावयाची स्थावर मालमत्ता ही शेती प्रकारात मोडत असल्यास प्रथमतः शेत मिळकतीचे पिक पाण्याचे उतारे हस्तगत करणे आवश्यक आहे.त्यामुळे शेत मिळकतीमधील मालकी हक्क व इतर हक्कात नमूद असलेल्या नोंदी बाबतची माहीती समजुन येते.
🌑 शेत मिळकत कुळ हक्काची, इनाम वतन अथवा अन्य इनाम वर्ग असल्यास त्याबाबत शेरा मिळकतीचे रेकॉर्ड मधील इतर हक्कात नमूद असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे जमिनीचा भोगवटादार वर्ग २ असा शेरा देखील नमूद असतो. त्यामुळे सदर मिळकतीबाबत हस्तांतरणाचा व्यवहार पूर्व परवानगी शिवाय करता येत नाही.शेत मिळकत खरेदी घेत असताना त्याबाबत संबंधीत महसुल अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.
🌑 तसेच सदर मिळकतीवरती वित्तीय संस्थेच्या कर्ज बोजाची नोंद असल्यास सदर कर्जाची परतफेड केलेबाबतची योग्य ती खात्री करणे आवश्यक आहे.
🌑 शेत मिळकतीचे इतर हक्कात कोर्टाकडील जप्ती आदेश, पोटगी आदेश, वगैरे अन्य स्वरूपाचे आदेश नमूद असल्यास मिळकत खरेदी घेताना त्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे.
🌑 अकृषीक एन.ए. वापराची जमीन खरेदी करताना संबंधीत कार्यालयाची परवानगी, मंजुर लेआऊट नकाशा व त्याचे विभाजन याबाबत पडताळणी करणे आवश्यक आहे.
🌑 मिळकत ज्या मालकाकडून खरेदी घ्यावयाची आहे त्यास मालकी हक्क कसा प्राप्त झाला ? नोंदणीकृत दस्ताने/कोर्ट हुकुमनाम्याने / महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे, वगैरे)
गावठाण हद्दीतील घर मिळकत खरेदी घेताना मागील ३० वर्षाचे ग्रामपंचायतीकडील नमुना ८ चे रेकॉर्ड व त्यावरील नोंद असलेले सर्व ठराव तपासून पाहणे आवश्यक असते. काहीवेळा ग्रामपंचायतीकडील नमूना ८ हे शेतामधील असलेल्या बांधकामाचे देखील असू शकतात त्यामुळे शेत मिळकतीबाबत वर नमूद केलेल्या तरतुदी या ठिकाणी देखील लागू होतात.
🌑 काही ठिकाणी गावठाण हददीतील मिळकतीचा सिटी सर्व्हे झालेला नाही तसेच ती मिळकत शेतीमध्ये समाविष्ठ नाही याची खात्री करणे करीता संबंधीत ग्रामपंचायतीकडील दाखला प्राप्त करणे आवश्यक आहे.
🌑 सिटी सर्व्हे मध्ये नमूद असलेली घर मिळकत खरेदी घ्यावयाची असल्यास संबंधीत मिळकतीचा प्रॉपर्टी कार्ड उतारा, खाडाखोडीचा उतारा, चौकशी रजिस्टरचा उतारा, नकाशा, मोजणीचा नकाशा, वगैरे गोष्टी पडताळून पाहणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे सिटी सर्व्हे मिळकतीच्या सत्ता प्रकार (अ/ब/क/ड, वगैरे) याबाबत देखील खात्री करणे आवश्यक असते.
🌑 त्याचप्रमाणे मिळकत खरेदी घेताना संबंधीत मिळकतीचा सर्च रिपोर्ट एखाद्या अनुभवी वकीलांकडून घेणे आवश्यक असते. स्थावर मालमत्ता खरेदी घेत असताना अनुभवी वकीलांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
अॅड.धनाजी पाटील
Ex.विधी अधिकारी,पोलीस अधिकारी कार्यालय
स्वानंद बिल्डींग,विनायकनगर,इस्लामपूर
जि. सांगली
भ्रमणध्वनी : 9822868166