दिवाळीच्या पहिल्या आंघोळीनंतर म्हणजेच 25 ऑक्टोबरला 2022 या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण पार पडल्यानंतर आता 15 दिवसांतच यंदाच्या वर्षातलेशेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे.जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र ग्रस्तोदित आहे.
हे ग्रहण कोठे कोठे दिसेल ?
भारतासह संपूर्ण आशिया,ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश व संपूर्ण दक्षिण अमेरिका या प्रदेशात ग्रहण दिसेल.
ग्रहणाचे स्वरूप काय आहे?भारतात कसे दिसेल?
हे ग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल.त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण स्पर्श दिसणार नाही.
भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशात खग्रास अवस्था दिसू शकेल .मात्र महाराष्ट्र आणि इतर प्रदेशात हे ग्रहण खंडग्रास दिसेल.
खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित )
कार्तिक शु. 15 दिनांक 8 नोव्हेंबर 2022 मंगळवार
ग्रहण स्पर्श – दुपारी 2.39
ग्रहण मध्य – दुपारी 4.30
ग्रहण मोक्ष – सायं 6.29
(सदर ग्रहण स्थिती ही मुंबई येथील आहे )
वरील वेळा संपूर्ण भारतात करिता चालतील.
ग्रहणाचा महत्त्वाचा काळ कोणता ?
ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ
ग्रहणाचा वेध कोणी व कसे पाळावेत
हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 8 नोव्हेंबरच्या सूर्योदयापासून मोक्षा पर्यंत म्हणजे सायंकाळी 6.29 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत.
बाल,वृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी मंगळवारी सकाळी 11 पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत.वेधामध्ये भोजन करू नये.
ग्रहणांत कोणकोणती कृती करावी?
सूर्यास्त होताच स्नान करावे.पर्व कालामध्ये देवपूजा,दर्पण श्राद्ध,होम,दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे.
ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे अशोच उच्च असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्ती शुद्धी असते.
ग्रहण कोणत्या राशीच्या व्यक्तीने पहावे? आणि कोणत्या राशीच्या व्यक्तीने पाहू नये?
मिथुन,कर्क,वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफल
सिंह,तुला,धनु,मीन या राशींना मिश्र फल
मेष,वृषभ,कन्या मकर या राशींना अनिष्ट फल आहे.
ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतीने हे ग्रहण पाहू नये.
तुळशी विवाह केव्हा करावा ?
कार्तिक शु.12 शनिवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह आरंभ असून पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्ती आहे.दिनांक 8 नोव्हेंबर रोजी मंगळवारी चंद्रग्रहण असल्याने सायंकाळी 6.19 नंतर म्हणजे ग्रहण मोक्ष झाल्यानंतर स्नान करून नंतर तुळशी विवाह करता येईल.
किंवा दि. 5,6,7 नोव्हेंबर पैकी एका दिवशी तुळशी विवाह करणे योग्य.