माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. या निमित्ताने आपल्यांशी पुस्तकांची गांवे आणि काही पुस्तक अवलिये या विषयांवर संवाद साधणार आहे.
पुस्तकांचं गाव ही संकल्पना प्रामुख्याने इंग्लंड,अमेरिका व युरोप खंडातील आहे.निसर्गरम्य परिसर, पुस्तकांची दुकाने,पर्यटन स्थळ, पुस्तकांबद्दलच्या चर्चा ही या पुस्तकांच्या गावांची वैशिष्ट्ये होत. जगभरात हे ऑन वे, टोकियो, पॅरिस, लंडन, पोर्टलंड, वॉशिंग्टन डी. सी.,एडींबरो,बर्लिन,सॅनफ्रान्सिस्को आदि 40 हुन अधिक गावे पुस्तकांची गावे (Books Town) म्हणून ओळखली जातात.पुस्तक प्रदर्शन,विक्री याबरोबरच साहित्यविषयक चर्चासत्रे,वाचक मेळावे ही या गावांची वैशिष्ट्ये होत.या पुस्तकांच्या गावांची आंतरराष्ट्रीय संघटना पण आहे.तर आपल्या देशातही पुस्तकांचं गाव ही संकल्पना आता हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागली आहे.आपल्या राज्यातील भिलार आणि केरळमधील पेरूमकुलम ही दोन गावे पुस्तकांची गावे म्हणून पथदर्शक भूमिका बजावीत आहेत.
आपल्या देशातील पहिले पुस्तक गाव होण्याचा मान सातारा जिल्ह्यातील भिलारचा.पाचगणी महाबळेश्वर रस्त्यांवर पाचगणी पासून 5 कि. मी. अंतरावर भिलार हे छोटेसे गाव आहे.पूर्वी ते strawberry बद्दल प्रसिद्ध होते. इंग्लड मधील वेल्स प्रांतातील हे ऑन वे ( Hay-on-wye) या गावाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने भिलार विकसित केले. हे ऑन वाय हे पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते.2011 ला 1598 लोकसंख्या असलेल्या या छोट्या गावात रिचर्ड बूथ याने 1962 ला पहिले पुस्तकाचे दुकान सुरू केले. हा बूथ स्वतःला हे चा राजा समजत असे.1970 पासून पुस्तकाचे गाव ही ओळख मिळाली. गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर या लेखकांनी इथे भेटी दिल्या होत्या. जगभरातील पुस्तकप्रेमी पर्यटकांसाठी ‘हे’ आकर्षण स्थळ आहे. इथे साहित्य विषयक कार्यक्रम होतात. या गावातील पडक्या किल्ल्याला रिचर्ड बूथ स्वतःचे राज्य तर स्वतःला सम्राट म्हणून घेत असे. इथे पुस्तकांची दुकाने आहेत. तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी या गावाला भेट दिल्यानंतर आपल्याकडेही पुस्तकाचे गाव आकाराला आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. 2017 ला शासनाने भिलार हे देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून घोषित केले. या गावातील 22 ते 25 ठिकाणी पुस्तके मोफत वाचायला मिळतात. 25 हजार पुस्तके उपलब्ध आहेत. लोकांच्या राहण्याची सोय आहे. ‘या, strawberry समवेत पुस्तकांचा आनंद घ्या’ अश्या घोषणा जागोजागी आहेत.’ग्रंथसखा पुस्तकालाय’ हे पुस्तक विक्रीचे दुकान आहे. साहित्यविषयक कार्यक्रम होतात. पुस्तकांचे गाव मेहनतीने सजवले असून ग्रंथ प्रवासी केंद्र म्हणून लौकिक प्राप्त आहे. फ्रान्समध्ये अशी आठ पुस्तक शहरे आहेत.
आपल्या देशातील दुसरे पुस्तकाचे गाव म्हणून केरळमधील पेरूमकुलम या गावाची घोषणा केरळच्या मुख्यमंत्र्यांनी 19 जूनला राष्ट्रीय वाचन दिनादिवशी केली. अमेरिकेतील free library movement आणि महाराष्ट्रातील भिलार यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू झाला. महात्मा गांधींच्या खुनानंतर पेरूमकुलम गावातील नागरिकांनी 1948 ला बापूजी मेमोरियल ग्रंथालय सुरू केले. 1916 ला नवी इमारत बांधली. गावातील अकरा ठिकाणी पक्ष्यांच्या घरट्यांसारखी पुस्तक घरे तयार केली. प्रत्येक घरट्यात 30 पुस्तके, वृत्तपत्रे ठेवतात. बालवाचकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम आता सर्वांसाठी खुला आहे. ही पुस्तके कोडू(घरटी) सजवलेली आहेत. आता या प्रत्येक घरट्यात 50 पुस्तके आहेत. ज्ञानपीठ विजेते एम. टी. वासुदेवन नायर यांनी 2019 लाच पेरूमकुलम हे कोलम जिल्ह्यातील गाव पुस्तक गाव म्हणून घोषित केले. गावातील रस्त्यांवर पक्ष्यांच्या घरट्यांच्या आकाराचे बॉक्स आणि त्यातील पुस्तके आबालवृद्धांसाठी आकर्षक स्थळ ठरली आहेत. एम. मुकुंदन हे लेखक या उपक्रमाचे patron (पालक) आहेत. स्थानिक वाचनालयाच्या उपक्रमातून संपूर्ण गावच शासनामार्फत पुस्तकग्राम म्हणून घोषित होणे हे केरळच्या साक्षरतेच्या परंपरेशी सुसंगत आहे. अर्थात केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. आपले भिलार पुस्तकांची संख्या, उपक्रमशीलता आणि वाचकांसाठी सेवा – सुविधा याबाबत अर्थातच आघाडीवर आहे.
आपल्या कलकत्यातील कॉलेज स्ट्रीट हे रविवारचा अपवाद वगळता सर्व दिवशी सुरू असणारे पुस्तक मार्केट आहे. जयपूरचा साहित्य मेळा देखील पुस्तके आणि लेखकांबरोबर थेट चर्चांसाठी लक्ष्यवेधी ठरला आहे. Readers’ Digest या मासिकात रॉबिन बॅब यांनी टोकियो, डब्लिन, सॅनफ्रान्सिस्को, पॅरिस, हे, लंडन, न्यू Orleans, वॉशिंग्टन, एंडी बरो, बर्लिन या शहरांचा पुस्तकांची शहरे असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र आणि केरळप्रमाणेच वाचन समृद्धीसाठी देशभर पुस्तकगावे विकसित होणे गरजेचे आहे.
पुस्तकांच्या गावप्रमाणेच देशात अनेक छोटी छोटी माणसे वाचन समृद्धीसाठी प्रयत्न करीत आहेत. Readers’ Digest ने नोव्हेंबर 2020 च्या अंकात काही पुस्तक अवलीयांची माहिती दिली आहे. तेलंगणा मधील शेख सादिक अली हे आपल्या ढकल गाडीवरून 2015 पासून लहान मुलांना कथा, कवितांची पुस्तके वितरित करतात. त्यांच्या या ढकल गाडीने (push-cart-library) तेलंगणा मध्ये 3 हजार कि. मी. चा प्रवास पूर्ण केला आहे. आता पर्यंत 50 लाख रुपये किंमतीची पुस्तके वाटली आहेत. सादिक अली व त्यांच्या पत्नी आपल्या उत्पन्नाच्या नव्वद टक्के रक्कम पुस्तकांवर खर्च करतात. त्यांनी कोरोना काळात गरीब मुलांना फोन देण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूतील तुतीकोरीन (तथकोडी) हे ठिकाण चेन्नईच्या दक्षिणेला 650 कि.मी. आहे. या गावातील नाभिक पॉनमरिअप्पन यांनी आपल्या 10×10 फूट आकाराच्या दुकानात 1500 पुस्तकांचे ग्रंथालय सुरू केले आहे. त्यांनी स्वतः आठवीतून शाळा सोडली आहे. ते आपल्या दुकानातील पुस्तके वाचून सारांश लिहणाऱ्या मुलांना केस कापताना सवलत देतात. अगदी याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील नाभिक विक्रम झेंडे यांनीही आपल्या दुकानात ग्रंथालय सुरू केले आहे. अरुणाचल प्रदेशात नगरुंग मीना या शिक्षिकेने निरजूली गावात रस्त्याच्या कडेला ग्रंथालय सुरू केले आहे. श्रीनगरच्या दाल लेकजवळ महंमद लतीफ ओटा यांनी प्रवाशांसाठी ग्रंथालय सुरू केले आहे. ते निरक्षर आहेत. पण माझ्यानंतर सुद्धा पुस्तकांना वाचक भेटत राहतील असा त्यांचा आशावाद आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील जंगलातील आदिवासी ग्रामीण भागात पी.व्ही. चिनाथंबी हे गृहस्थ आपल्या झोपडीवजा घरातून 160 पुस्तकांचे ग्रंथालय चालवतात. ते मथावान जातीच्या आदिवासींना पुस्तके वाचनासाठी देतात. पुस्तकांवर प्रेम म्हणजे labour of love आहे.
महात्मा फुले यांनी तर सामान्य माणसाला परवडतील अश्या आपल्या पुस्तकांच्या किंमती ठेवल्या होत्या. आपल्या मंगेश पाडगावकरांनी लिहून ठेवलय, जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र कोंडले जाते. ग्रंथ संस्कृतीचा विस्तार आणि करण्यासाठी संस्थात्मक आणि व्यक्तिगत प्रयत्नांची सांधेजोड हवी. पु.ल. देशपांडे यांनी म्हटलंय, बंगाली माणसाचं स्वप्न असायचं, आपले एक छान घर असावे. घराच्या मागे तलाव असावा. तलावात मासे असावेत. घरात एका खोलीत चिक्कार पुस्तके असावीत.’ पु.लं. नी लिहलेले हे स्वप्न देशातील प्रत्येक माणसाचे बनावे. आपल्या देशाचे वाचनप्रेमी मा. राष्ट्रपती डॉ. ए.पी.जी.अब्दुल कलाम यांनी तामिळनाडूतील इरोंद येथील पुस्तक पंढरीत 2 लाख लोकांना वाचनाची शपथ दिली. ही शपथ अशी,
‘मी आजपासून माझ्या घरात किमान 20 पुस्तकांचे एक ग्रंथ संग्रहालय सुरू करीन. त्यातील 10 पुस्तके मुलांसाठी असतील. माझी मुलं त्यांत भर घालून त्यांची संख्या 100 वर नेतील. नातवंडे 200 वर नेतील. हे ग्रंथ संग्रहालय आमच्या जीवनाचा अमूल्य ठेवा असेल. आमच्या कुटूंबाची संपत्ती असेल. आम्ही दिवसाला किमान एक तास ग्रंथालयात व्यतीत करू.’ युनेस्कोच्या घटनेच्या शेवटच्या प्रकरणात पुस्तकाची सनद आहे. ती अशी, युद्धाची सुरवात माणसांच्या मनात होते. त्यामुळे शांतीची संरक्षण यंत्रणा माणसांच्या मनातच उभारली पाहिजे. बौध्दिक वातावरण निर्माण करण्यात पुस्तकांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळे पुस्तके ही शांतीची प्रमुख संरक्षण यंत्रणा आहे.’ वाचन शत्रूंऐवजी वाचन मित्रांची संख्या वाढवू अशी सामूहिक शपथ आपण घेऊ या.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर