माझा देव माझा आदर्श,गुरुवर्य व पितृतुल्य जे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आज अखेर महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा जागर करत आहेत ते ज्येष्ठ संपादक व विचारवंत मधुकर भावे.त्यांच्याकडे महाराष्ट्राचा पुरोगामी वाटाड्या (दिशादर्शक) म्हणून पाहिले जाते.आज त्यांचा ८३ वा वाढदिवस त्यांनी १००० पूर्ण चंद्र आणि हजारो पूर्ण सूर्य पाहिले आहेत.महान माणसं पाहिली आहेत,तेवढ्याच महान घटनाही पाहिल्या आहेत.त्यांना शतकी निरोगी दीर्घायुष्य लाभावे व त्यांनी शतक वीर व्हावं हेच साईबाबांच्या चरणी साकडे !
पुराेगामी विचारांनी धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र घडला. पुराेगामीत्व हीच गाैरवशाली महाराष्ट्राची अाेळख. मात्र आज हा विचार बाजूला पडून द्वेषभावना बळावत चालली आहे. राजकारणातील नैतिक अधिष्ठान,सुसंस्कृतपणा कमी हाेत चालला आहे. ज्या पुराेगामी विचारांनी महाराष्ट्र अबाधित,अखंड ठेवला,त्या विचारांची नव्या पीढीला ओळख करून देण्याची गरज आहे.अशावेळी महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील एक नाव ठळकपणे समाेर येतं,ते म्हणजे मधुकर भावे.
काळाच्या ओघात सर्वधर्मसमभाव कमी होऊन जातीपातीचे राजकारण उदयास येऊ लागले आहे. त्याने राज्याचे भले हाेईल का? राज्याची वाटचाल काेणत्या दिशेने सुरू आहे? यासारख्या प्रश्नांनी महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ आहे. मात्र महाराष्ट्राला तारणार आहे ताे पुराेगामी विचारच! राज्याच्या हिताकरिता नव्या पिढीला पुराेगामी विचार समजावून सांगणं आवश्यक आहे.पण ते सांगणार कोण? त्या विचारांची तेवढी माहिती कोणाला आहे? आणि त्या विचारावर निष्ठा किती लोकांची आहे? असे लोक किती राहिलेत? मात्र याही परिस्थितीत पुरोगामी विचारांचे एक शेलार मामा आजही लढत आहेत. जातीवादी, धर्मवादी, रूढीवादी जोखडात अडकत चाललेला महाराष्ट्र (कोंढाणा) मुक्त करण्यासाठी झगडत आहेत. त्या शेलार मामाचं नाव आहे, मधुकर भावे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ‘वाटाड्या’ म्हणून मधुकर भावे मार्गदर्शक ठरत आहेत.
भावेसाहेब संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनचे साक्षीदार.तेव्हापासून आजअखेर ते पुरोगामी विचार घेऊन पत्रकारिता करत आहेत. काँग्रेस पक्ष पुरोगामी विचारधारेशी बांधला आहे. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या प्रगतिक विचाराचे एकांडे पाठीराखे भावे साहेब राहिले आहेत. आजही आपल्या त्याच भूमिकेचा ‘घेतला वसा टाकणार नाही’ असा कैवार घेणारे, त्यासाठी वाणी आणि लेखणी झिजवणारे भावे साहेब महाराष्ट्रात जिथे जिथे जातील तिथे ते पुरोगामी विचारांचा जागर करून ते विचार रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा ‘वाटाड्या’ संबोधले जाते. तत्व आणि विचारांची बांधिलकी भावे साहेबांनी कधीही सोडली नाही.
श्रद्धेत खोट नाही आणि निष्ठेत फट नाही,असं हे व्यक्तिमत्व.निरपेक्षपणे पुरोगामी विचार तेवत ठेवण्याचे काम करत आहे.महाराष्ट्राचा रस्ता अन रस्ता,कार्यकर्ता अन कार्यकर्ता, त्यांचे रंग ढंग त्यांना तळ हातावरच्या रेषेसारखे पाठ आहेत. भावे साहेब पेन आणि कागदाला वाहून घेतलेले व्रतस्थ संपादक आहेत. या वयातही त्यांची लेखणी तरणी बांड आहे.त्यांचा उत्साह व काम करण्याची पद्धत तरुणांना लाजवेल अशीच आहे. ‘वार्धक्यपरी शैशवास जपणे’ हे त्यांच्या स्वभावात उपजत दिसते. त्यामुळे त्यांचे सर्व वयोगटात मित्र आहेत.भावे साहेबांच्या तत्त्वनिष्ठा आणि उत्साहाला सलाम. त्यांना शतकी निरोगी दीर्घायुष्य लाभावे व त्यांनी शतक वीर व्हावं, हीच त्यांना वाढदिवानिमित्त सदिच्छा !
जगदीश पाटील
पत्रकार,कराड