सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली । तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत प्रवेश करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानात 5G सेवेचा शुभारंभ करतील. 5G तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल.
सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत.