नवी दिल्ली ।
देशातील अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे.येत्या पाच दिवसांत गुजरात,महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्र,गुजरात,गोवा,आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.आज पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली एनसीआरमध्ये मंगळवारसाठी ‘यलो’ आणि बुधवारी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.आज दिल्लीत ढगाळ वातावरण असेल आणि हलका ते मध्यम पाऊस असेल.सोमवारी पुन्हा आर्द्रतेमुळे दिल्लीकरांचे हाल झाले,आज पाऊस झाल्यास दिलासा मिळू शकतो.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 5 ते 8 जुलैपर्यंत देशातील मध्य, पश्चिम आणि वायव्य राज्यांमध्ये पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या विविध भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली येथे 7 आणि 8 जुलैला, पश्चिम उत्तर प्रदेशात 6 जुलैला, पूर्व राजस्थानमध्ये 4 ते 8 जुलैला आणि पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये 5 ते 8 जुलैला मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये एनडीआरएफ अलर्ट
गुजरातमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ‘NDRF’ ची टीम तैनात केली आहे. ही टीम आनंद, नवसारी, गीर सोमनाथ, राजकोट, गांधीनगर, सुरत आणि बनासकांठा येथे तैनात करण्यात आली आहे.
देशभरात मान्सूनचे सावट,चांगल्या पावसाची प्रतीक्षा
नैऋत्य मान्सूनने देश व्यापला आहे.त्याच्या प्रभावामुळे अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. ईशान्येकडील, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. अनेक भागांना पुराचाही सामना करावा लागत आहे, परंतु तरीही देशाच्या काही भागात व्यापक आणि मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीपासून वंचित राहिलेले भागही पाण्याखाली जातील.
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने डेहराडूनमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा इशारा दिला आहे.सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने डेहराडून, नैनिताल,चंपावत आणि बागेश्वर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान खात्यानुसार, बिहार, झारखंड, आसाम, मेघालय, उत्तराखंड आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडेल. दुसरीकडे, दिल्ली-एनसीआर, छत्तीसगड, ओडिशा, यूपी, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. IMD नुसार गोवा, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, कोकण, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, पूर्व गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.