बहेच्या नारायण कुंभार यांनी जपले ‘इको फ्रेंडली’गणेश मूर्तींचे वेगळेपण
प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ मूर्तींना वाढती मागणी
मूर्तिकार नारायण कुंभार हे दरवर्षी तयार करतात शाडूच्या गणेश मूर्ती
शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांची संख्या अगदी मर्यादित
शाडूची माती मिळणे दुर्मिळ झाले,दरात १५ ते २० टक्के वाढ
शाडूपासून बनविलेल्या गणेश मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल
सांगली ।
गणेशोत्सवाला अद्याप दोन महिन्यांचा अवधी असला तरीही गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.गणेशमूर्तींचे रंगकाम लवकरच सुरु होणार आहे. शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ गणेश मूर्तीना मुर्तिकारांकडे आतापासूनच वाढती मागणी आहे.शाडूची माती,वाहतूक आणि रंगाचे वाढते दर यामुळे घरगुती गणेश मूर्तींच्या दरात १५ ते २० टक्के वाढ होणार असल्याची माहिती बहे येथील मूर्तिकार नारायण कुंभार यांनी सांगितले.
गणेशोत्सवाला अद्याप दोन महिन्यांचा अवधी आहे.मूर्तिकारांकडे गणेश मूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरु आहे.गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.अनेकांकडे गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत.सध्या नक्षीकाम सुरु आहे.गणेशमूर्तींचे रंगकाम लवकरच सुरु होणार आहे.पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असताना गणेश उत्सवात ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापणेसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ मूर्तींना मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.शाडूची माती मिळणे दुर्मिळ झाले आहे.राज्यात कोल्हापूर,इस्लामपुर,तसेच बहेसह अन्य काही मोजक्या गावांचा अपवाद वगळता सर्वत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
विविध अंगानी पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.पारंपरिक सणांतूनही यामध्ये भर पडत आहे.गणेश मूर्तीपासून निर्माल्यापर्यंत प्रश्न निर्माण होत आहेत . पण,बहे येथील मूर्तिकार नारायण कुंभार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शाडूच्या ‘इको फ्रेंडली’ गणेश मूर्ती बनवून वेगळेपण दाखवले आहे.मुळचे बहे येथील पण,व्यावसायानिमित्त इस्लामपूर येथील महादेवनगरमध्ये स्थायिक झालेले नारायण कुंभार हे प्रत्येकवर्षी शाडूच्या गणेश मूर्ती तयार करतात.
शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांची संख्या अगदी मर्यादित आहे.आणि शाडूची माती ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या शेणगाव तसेच अन्य काही मोजक्या भागातच उपलब्ध होते.ही गौण खनिज संपत्ती आता दुर्मिळ होत चालल्याने तिचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढले असून शाडूची माती गणेश मूर्ती बनविण्यासाठी तयार करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये उत्तम प्रतिचा कापूस घालून लाकडाच्या मुंगलीने त्याचा एकजीव करावा लागतो.मग अतिश्रमानंतर ती शाडू माती गणेश मूर्ती तयार करण्यासाठी योग्य होते.आणि शाडूपासून एक दीड फुटी गणेशमूर्ती तयार करण्यास किमान पाच ते सहा तास वेळ द्यावा लागतो.तर याउलट चार तासात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या २० हुन अधिक गणेश मूर्ती तयार होतात.
मूर्तिकार नारायण कुंभार हे प्रत्येक वर्षी मोठ्याप्रमाणात शाडूच्या गणेश मूर्ती तयार करतात.सध्या मूर्ती तयार झाल्या आहेत.नक्षीकाम सुरु आहे.तर रंगकाम लवकरच सुरु होणार आहे.शाडूच्या मूर्तीना वाढती मागणी आहे.ही मागणी लक्षात घेऊन पुढील वर्षांपासून शाडूच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.कुंभार गेली ४०- ४५ वर्षांपासून केवळ शाडूच्याच मूर्ती बनवित आहोत.६ इंचापासून ते अडीच फुटापर्यंतच्या उंचीच्या गणेशमूर्ती ते बनवतात.साधारणपणे एका लहान गणेश मूर्तीसाठी १ किलो शाडूचा वापर करावा लागतो.दगडूशेट,लालबाग,मोठा कानवाला,संत ज्ञानेश्वर,तिरपा पाय,प्रभावळी,बजाप,मोरावळी,मोठं सिंहासन अशा मॉडेलमध्ये या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.शाडूच्या मूर्तीना परदेशातूनही मागणी असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तीमुळे होणारे वाढते जलप्रदूषण थांबविण्यासाठी शाडूच्या गणेश मूर्तीला चांगलेच महत्व प्राप्त झाले असून शाडूपासून बनविलेल्या गणेश मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे.मागणी वाढत असली तरी शाडूची दुर्मिळता आणि द्यावा लागणारा वेळ तसेच परिश्रम परिणामस्वरूप शाडूपासून गणेश मूर्ती तयार करण्याची ग्राहकांची मागणी मूर्तिकार पूर्ण करू शकत नसल्याबद्दल मूर्तीकार कुंभार यांनी खंत व्यक्त केली.कुंभार यांना गणेशमूर्ती तयार करणे,रंगकाम करणे आदी कामात त्यांच्या पत्नी उमाताई,मुलगा प्रवीण,सून सौ.सारिका,इयत्ता चौथीत असणारी नात श्रावणी हेदेखील मदत करत असतात.