Last Updated on 28 Apr 2025 10:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit

वार्षिक परीक्षा संपल्या आणि उन्हाळी सुट्टी लागली की, मुलांना एखाद्या साहसी आणि रोमांचकारी समर कॅम्पला पाठवणं ही अनेक कुटुंबांची आजच्या काळात एक अलिखित परंपरा झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांना नैसर्गिक अनुभव मिळवून देण्यासाठी, नवीन मित्र जोडण्यासाठी व कौशल्ये विकसित करण्यासाठी समर कॅम्प एक मोठं माध्यम ठरलं आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांत विविध स्वरूपाचे कॅम्प मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात.
साहसी खेळ, गड-किल्ल्यांच्या ट्रेकिंग मोहिमा, जंगल सफारी, जलक्रीडा, हस्तकला कार्यशाळा, विज्ञान प्रयोग, निसर्गसंवर्धन उपक्रम अशा अनेक प्रकारच्या कॅम्पना पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. मुलांना त्यांच्या सुरक्षित सिमेच्या बाहेर नेऊन, धाडस शिकवणं, आत्मविश्वास वाढवणं, स्वयंशिस्त अंगी बाणवणं या दृष्टिकोनातून समर कॅम्प्सचा खूप सकारात्मक उपयोग होतो.
मात्र, यामध्ये एक अंधुक बाजूही समोर येते आहे. काही ठिकाणी या कॅम्पचं आयोजन फक्त व्यावसायिक फायद्यासाठी केलं जातं. नियोजनातील हलगर्जीपणा, सुरक्षा यंत्रणांचा अभाव, प्रशिक्षकांची अपुरी पात्रता यामुळे अपघात घडल्याच्या घटना वाचनात आल्या आहेत. परिणामी, पालकांमध्ये भीती व शंका वाढत आहे. मुलांच्या आरोग्याची, सुरक्षेची आणि भावनिक समतोलाची जबाबदारी योग्यरीत्या पाळली गेली पाहिजे, अशी जोरदार अपेक्षा आता व्यक्त केली जाते आहे.
खरंतर, समर कॅम्प ही संधी आहे केवळ साहसी खेळ शिकवण्याची नव्हे तर मुलांच्या सर्वांगीण विकासाची.
उगमस्थानीच जर देशभक्तीची बीजे पेरायची असतील, तर लहान वयातच त्यांच्यात सामाजिक भान, पर्यावरणप्रेम, सहिष्णुता, शिस्त, स्वच्छतेची जाणीव, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या गुणांचा समावेश व्हायला हवा. याशिवाय, संघटन कौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, सहकार्य आणि सामंजस्य या जीवनकौशल्यांचा विकास देखील समर कॅम्पच्या माध्यमातून साधता येऊ शकतो.
आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना केवळ शैक्षणिक यश मिळवण्यासाठी नाही, तर समृद्ध आणि सशक्त नागरिक घडण्यासाठीही तयारी करायला हवी. समर कॅम्प हे एक उत्तम साधन असू शकते, जर आयोजकांचा दृष्टिकोन व्यापक असेल आणि मुलांच्या संवेदनशीलतेचा योग्य सन्मान केला गेला तर.
म्हणूनच, समर कॅम्पची निवड करताना पालकांनी जाहिरातबाजीवर फसून न जाता आयोजकांची पार्श्वभूमी, कॅम्पचे नियोजन, सुरक्षा सुविधा, प्रशिक्षकांचा अनुभव, आपत्कालीन उपाययोजना यांची सखोल चौकशी करायला हवी. याशिवाय मुलांनाही त्यांच्या आवडीप्रमाणे कॅम्प निवडण्यासाठी स्वातंत्र्य देणं महत्वाचं आहे, जेणेकरून ते त्या अनुभवाचा संपूर्ण आनंद घेऊ शकतील.
समर कॅम्प हे मुलांचं फक्त करमणुकीचं साधन न राहता, त्यांच्या आयुष्याला आकार देणारी शाळा ठरली पाहिजे. फक्त साहस नाही, तर संस्कार, शिस्त आणि समाजप्रेमाचंही बीज त्यात पेरलं गेलं पाहिजे. कारण आजचे हे छोटं पाऊल उद्याच्या मोठ्या देशभक्त नागरिकाच्या प्रवासाची सुरुवात ठरू शकते.
![]()














































































