Last Updated on 22 Mar 2025 3:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नको, तर समाजाची जाणीवही असली पाहिजे. या उद्देशाने इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेर्ले येथील शिवशंभो वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांना वृद्धाश्रमातील जीवनाची जवळून ओळख झाली, आणि समाजाच्या वास्तवाची जाणीवही!
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम. जाधव म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी केवळ व्याख्याने ऐकू नयेत, तर प्रत्यक्ष अनुभव घ्यावेत. वृद्धाश्रम ही काळाची गरज झाली असली तरी आपल्याच कुटुंबातील सदस्य वृद्धाश्रमात जाऊ नयेत, यासाठी संवेदनशीलता रुजविणे आवश्यक आहे.’
सेवा की जबाबदारी?
समन्वयक प्रा. स्वाती चव्हाण यांनी सांगितले की, ‘आजची पिढी मोबाईलच्या आभासी दुनियेत हरवली आहे. संवेदनशीलता कमी होत चालली आहे. वृद्धांना भेटून, त्यांच्या व्यथा ऐकून विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे.’
वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक शिंदे म्हणाले, ‘आपल्या घरातील वृद्धांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये. वृद्धांची सेवा केल्याने केवळ त्यांनाच नाही, तर आपणालाही समाधान मिळते.’
हेही वाचा – विद्यार्थ्यांचा नवा प्रयोग! इस्लामपुरात नैसर्गिक रंगांनी रंगली…
या भेटीदरम्यान श्रेयस घबक, दिशा लोखंडे, स्वराली नाटेकर, निर्जला जाधव आणि ऋतुजा मोहिते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वृद्धांसोबत घालवलेला वेळ ‘आयुष्यभर लक्षात राहील’ अशी भावना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांशी गप्पा मारत त्यांच्या जीवनाचा अनुभव ऐकला. महाविद्यालयातर्फे आश्रमाला किराणा मालाचे साहित्य भेट देण्यात आले. वाळवा तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव ॲड. धैर्यशील पाटील आणि मानद सचिव ॲड. बी.एस. पाटील यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.
आभार निवास कांबळे यांनी मानले आणि सांगितले की, वृद्धाश्रमात वृद्ध येण्यामागे अनेक कारणे आहेत, मात्र अशा भेटीमुळे समाजामध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.














































































