Last Updated on 19 Nov 2021 8:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आंदोलन चिघळले…! ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले,एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
बुलढाणा :
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची अन्नत्याग आंदोलनानंतर तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली आहे.दरम्यान,अचानक बुलडाणा पोहोचलेल्या त्यांच्या मातोश्री गिताबाई तुपकर यांनी जेव्हा रविकांत तुपकर यांना बघितले,तेव्हा त्यांना अक्षरशः गहिवरून आले.
तूपकरांची प्रकृती पाहून त्यांच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला.आणि उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले.‘माझा पोरगा गुंडा नाही, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो आहे. त्याच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास, सरकार जबाबदार राहील’, असे म्हटले. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी माझा पोरगा लढत आहे. तो कुणी डाकू नाही, गुंडगिरी करत नाही, शेतमालाला भाव मिळावा, यासाठी ३ दिवस झाले त्याने अन्नाचा कण देखील खाल्लेला नाही. आज त्याची तब्येत फार खराब झाली. तो अदानी, अंबानी नाही, कष्टाने कमावलेल्या मालाला भाव मागतोय. त्याच्या आईवडिलांच्या आणि सर्व शेतकऱ्यांच्या घामाला भाव मागतोय. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला आहे, असे गीताबाईंनी म्हणत सरकारला साद घातली.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे.
सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबरला नागपूर येथे संविधान चौकात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान रात्री 11.30 वाजता पोलिसांनी जबरदस्तीने तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात बुलडाणा येथे सोडण्यात आले.परंतु, तुपकरांनी आपले आंदोलन मागे न घेता ते सुरूच ठेवले.काल गुरुवारी (ता. १८) पहाटे 6 वाजता बुलडाण्यात पोचल्यावर त्यांना निवासस्थानासमोर ते सत्याग्रहास बसले.
दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली यामध्ये त्यांची शुगर वजन कमी झाली असून रक्तदाब वाढला आहे.बोलण्यासाठी सुद्धा त्रास होऊ लागला आहे.डॉ. प्रवीण पिंपरकर यांनी त्यांच्या विविध तपासण्या केल्या. मात्र दुसरीकडे शासकीय यंत्रणा त्यांच्या आंदोलना दरम्यान प्रकृतीची कोणतीही काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शासकीय यंत्रणेविरोधात रोष व्यक्त होत आहे.
ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा आज,१९ नोव्हेंबरला तिसरा दिवस उजाडला.टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या या आंदोलनात आज हजारो शेतकऱ्यांनी सकाळी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला.आंदोलनामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. शेकडो शेतकऱ्यांना दुपारपर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशासनाने आंदोलनाकडे दूर्लक्ष चालवल्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ठरल्याप्रमाणे आज सकाळी आठपासून पूर्वनियोजित ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले.
खामगाव मार्गावरील वरवंड फाट्यावर शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊला हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.जवळपास दोन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.खेर साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने वाहतूक पूर्ववत झाली.बुलडाणा- चिखली मार्गावरील येळगाव,चिखली- खामगाव रोडवरील सोमठाणा फाटा व पेठ फाटा येथे विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.चिखली- देऊळगाव राजा मार्गावरील मेरा फाटा व देऊळगाव मही येथे रास्तारोको आंदोलन सुरू असल्याने दोन- तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या चिखली- मेहकर, बुलडाणा- धाड,खामगाव- अकोला, खामगाव – नांदुरा ,बुलडाणा -मोताळा या मार्गावर रास्तारोको आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलन चिघळले,एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची आज तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली असून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने हे आंदोलन चिघळत चालले आहे.
या निष्ठुर सरकारला शेतकऱ्यांचे आणखी बळी पाहिजेत का? किती बळी पाहिजेत, असे म्हणत स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला.यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये राडा झाला. बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी शेख रफिक यांना वेळीच रोखले आणि अनर्थ टळला.










































































