Last Updated on 06 Apr 2025 6:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत उद्या, ७ एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र आरोग्य सन्मान – २०२५’ सोहळा आणि राज्यातील नव्या आरोग्य सेवा योजनांचा भव्य शुभारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आदी मान्यवरही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमास आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवांचे आयुक्त अमगोथ रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ आण्णासाहेब चव्हाण, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान संचालक डॉ. स्वप्नील लाळे आणि विविध मान्यवर अधिकारीही उपस्थित राहतील.
‘आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्यानुसार, महाराष्ट्र सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यास कटिबद्ध आहे. या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नव्या आरोग्य योजना सुरू करण्यात येणार असून, राज्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना ‘महाराष्ट्र आरोग्य सन्मान’ व पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.
खालील आरोग्य सेवा योजनांचा होणार शुभारंभ…
- e-Sushrut (HMIS System) संकेतस्थळाचे विस्तारीकरण शुभारंभ.
- महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे (Bombay Nursing Home Act) ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण शुभारंभ.
- राज्यातील 6 जिल्ह्यांत 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ.
- राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामाच्या ऑनलाईन संनियंत्रण व पाठपुरावा सॉफ्टवेअरचे उद्घाटन.
- गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (9 ते 14 वर्षे वयोगट) अभियान – कर्करोगासंबंधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी.
- महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ – आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठीही खुली.
- महाराष्ट्र राज्यात सीपीआर प्रशिक्षणाचे उद्घाटन व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.
- आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ.
- महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 पारितोषिक वितरण आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान.














































































