Last Updated on 04 Jul 2025 7:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भगर उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. भगर खाण्यापूर्वी घ्या योग्य खबरदारी घ्यावी. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. दि. 06 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी असल्याने त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भगरीचे सेवन केले जाते. भगर खाताना काळजी घ्यावी.
भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. जुलै महीन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
भगर खाताना काय काळजी घ्यावी
बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रॅंड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेणे टाळावे. भगर घेताना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा.
भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त
दिवस भगर साठवू नका तसेच जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.
भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे याचे सेवन करताना काळजी घ्यावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका.
भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन अॅसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादेतच करावे.
भगर विक्रेत्यांसाठी सुचना
विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करताना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी. भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खूली भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.














































































