Last Updated on 18 Sep 2025 9:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | बांबू लागवड ही एक उत्तम आर्थिक आणि पर्यावरण संरक्षण करून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा फायदेशीर आणि शाश्वत स्रोत बनण्यासोबतच, पर्यावरणाच्या संवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा विचार करणे फायदेशीर ठरणारे असून शेतकऱ्यांना लखपती बनवणारे हे पीक असल्याचे ‘मनरेगा’चे महासंचालक नंदकुमार यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त चर्चासत्र झाले. यावेळी डेहराडून संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अजय ठाकूर, कोल्हापूर येथील बांबू उत्पादक शेतकरी अमित पाटील, केरळ वन संशोधन संस्था (केएफआरआय माजी प्रमुख शास्त्रज्ञ (वन अनुवंशशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभाग) डॉ. ई. एम. मुरलीधरन सहभागी झाले. फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर्स, नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक मुकेश गुलाटी यांनी पॅनेल चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
मान्यवरांनी बांबू लागवडीचे फायदे नमूद करताना सांगितले की, पडीक व माळरानावर बांबू लागवड अत्यंत फायदेशीर आहे. बांबूची लागवड आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम करणारी आहे. बांबू लागवड पर्यावरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे, बांबू मातीची धूप रोखून तापमानवाढ कमी करण्यास मदत करते. बांबू लागवड जर योग्य मार्गदर्शनातून केली तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अधिक उत्पन्न मिळू शकते. बांबूला ऊसापेक्षा जास्त दर मिळतो आणि उत्पादन देखील चांगले असते.राष्ट्रीय बांबू लागवड अभियानातंर्गत शेतक-यांना बांबू लागवडीसाठी सात लाख रूपये मदत दिली जाते. बांबूचा उपयोग बांधकाम, फर्निचर, कागद निर्मिती, ऊर्जा आणि हस्तकला अशा अनेक उद्योगांमध्ये होतो.ज्यामुळे त्याची मागणी कायम असते. बांबूची मुळे जमिनीत घट्ट पकड घेतात, त्यामुळे मातीची धूप रोखली जाते. बांबूची लागवड प्रदेशनिहाय वेगवेगळी करणे गरजेचे आहे.शासनाकडून बांबू लागवडीसाठी उत्कृष्ट दर्जाची रोपे वितरण करणे यासाठी अधिकृत केंद्राची उपलब्धता करुन देण्यात यावी. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार हा व्यवसाय आहे. काही कालावधीनंतर या पिकाची कमी मनुष्यबळात देखरेख करता येते. कोल्हापूरचे बांबू उत्पादक शेतकरी अमित पाटील यांनी १५० एकर डोंगर क्षेत्रात केलेली लागवड आणि त्यापासून मिळालेले फायदे याची माहिती सविस्तर सांगितली. डॉ. ई. एम. मुरलीधरन यांनी बांबू लागवड शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे असे सांगितले. डॉ. अजय ठाकूर यांनी बांबू लागवडीसाठी कोणती रोपे प्रदेशनिहाय आवश्यक आहेत, याची माहिती दिली.
बांबू उद्योगाचे राष्ट्रीय उत्पादनात मोठे योगदान
मुंबई : जागतिक बांबू दिनानिमित्त फिनिक्स फाऊंडेशन, लोदगा (लातूर) आणि मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या घोषवाक्याखाली एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबईं येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञांच्या सहभागाने विविध सत्रे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात बांबूच्या उपयोगाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणातील त्याचे योगदान तसेच शाश्वत विकासात बांबूची भूमिका यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. “बांबू आधारित उद्योग” या सत्रात उद्योजक नीरज मुथा, प्राध्यापक पराग नेमाडे, प्रोफेसर निर्मला आणि बांबू पेटंटधारक गणेश वर्मा यांनी सहभाग घेतला.

बांबू उद्योग हा स्टील उद्योगास पर्याय म्हणून पुढे येत असून बांबूमध्ये स्टिलला टक्कर देण्याची पूर्ण क्षमता आहे. बांबूचे १५०० हून अधिक उपयोग असून घरे तसेच पायाभूत विकास करताना बांबूचा उपयोग केला जात आहे. बांबूचा उपयोग घरामध्ये केला तर १०० वर्षे टिकून राहू शकतो. तथापि, बांबूचा वापर वातावरणात केला तर त्यावर रासायनिक आवरण लावल्यास बांबू अधिक काळ टिकू शकतो. बांबू पासून एक टॉवर तयार करण्यात आला असून त्यास प्रशस्तीपत्र सुद्धा मिळाले आहे. बांबूला काही ठिकाणी बल्ली असेही संबोधले जात असले तरी ते बाहू – बल्ली प्रमाणे असल्याचे गणेश वर्मा यांनी मत व्यक्त केले.
भारत हा बांबूचे सर्वात मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश आहे. बांबूपासून सेल्युलोज आणि लिग्नीन मोठ्या प्रमाणात तयार करता येते. बांबूचा उपयोग रसायन उद्योगात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मत पराग नेमाडे यांनी व्यक्त केले.
ऋग्वेदामध्ये बांबूला कल्पवृक्ष म्हटले असल्याचे प्रोफेसर निर्मला यांनी सांगितले. बांबू हे बहुआयामी उत्पादन आहे. बांबूचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जात असून बांबू हे सुपर फूड आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखनऊ येथे झालेल्या प्रदर्शनात नीरज मुथा यांच्या कारखान्यात तयार झालेले बांबू उत्पादन पाहिले. त्यानंतर मुथा यांचे बांबूपासून तयार झालेले फर्निचर नवीन संसदेत वापरण्यात आले आहे. मुंबई येथील राजभवन येथेही बांबू निर्मित उत्पादन वापरण्यात येत आहे. बांबूचा उपयोग फर्निचर, भिंती सजावट, दरवाजे, खिडक्या, फ्रेम आदींमध्ये करण्यात येत आहे. बांबू उद्योग सकल राष्ट्रीय उत्पादनात खूप मोठे योगदान देत असून याद्वारे ५० हजार प्रत्यक्ष आणि १.५ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करत असल्याचे मत मुथा यांनी या सत्रात व्यक्त केले.
स्रोत : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय













































































