Last Updated on 12 Mar 2025 4:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय राजकारण हे क्रिकेटप्रमाणेच अप्रत्याशित असते. येथे कोण कधी ‘बॅटिंग’ करेल आणि कोण ‘बेंच’वर जाईल, याचा नेम नाही! निवडणुका जवळ आल्या की, काही नेते अचानक ‘बॅटिंग ऑर्डर’ बदलतात. एरवी संघासाठी मैदानात झुंजणारे काही खेळाडू (नेते) नवीन संधीच्या शोधात संघ बदलतात. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो – खरा संघभाव (पक्षनिष्ठा) कुठे आहे?
काही नेते राजकारणात सलामीवीर असतात, सतत सक्रिय राहतात. तर काहींना संधी मिळाल्यावरच ते ‘बॅटिंग’ करतात. काहींना तर अंतिम षटकांत ‘फिनिशर’ बनण्याची संधी दिली जाते. परंतु, प्रत्येक संघात असे खेळाडूही असतात, जे संघात असूनही खेळात नसतात – ‘बेंचवर’च असतात.
स्वार्थासाठी की जनसेवेसाठी ‘बॅटिंग’?
महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, राजकीय खेळाडू पक्षांतर का करतात? काही जण ‘क्लीन बोल्ड’ होण्याच्या भीतीने संघ बदलतात, तर काहींना फॉर्म नसतानाही सत्ता-सुविधांची ‘ऑफर’ मिळते. काहींना संघातील ‘कॅप्टन’ पटत नाही, तर काहींना ‘रन’ (सत्ता) काढण्यासाठी सरळ दुसऱ्या संघात प्रवेश करणे सोयीचे वाटते.
लोकशाहीत मतदार हा मुख्य ‘थर्ड अंपायर’ आहे. तो नेत्यांच्या ‘फेरफारां’कडे लक्ष ठेवून आहे. क्रिकेटप्रमाणेच, इथेही चुकीच्या ‘शॉट’वर बाद होण्याची शक्यता असते. काही नेते ‘फिक्सिंग’च्या आरोपाखाली सापडतात, तर काहींना ‘हिट विकेट’ व्हावे लागते.
नवीन बॅटिंग ऑर्डर कोण ठरवणार?
प्रत्येक पक्षातील मतदारांना प्रश्न पडतो – पक्षातील खरी ताकदवान ‘प्लेयिंग इलेव्हन’ कोण आहे? ज्यांनी संघासाठी प्रामाणिकपणे खेळले, त्यांना संधी मिळणार का? की ‘फेरविचार’ करून बाहेरून आलेल्यांना थेट ‘कॅप्टनसी’ दिली जाणार?
राजकारणात गरज आहे, अशा नेत्यांची, जे संघ न सोडता टिकून राहतील, संघासाठी लढतील. राजकीय बॅटिंग ऑर्डर ठरवताना, ‘थर्ड अंपायर’ अर्थात जनतेने योग्य निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा, निवडणुकीनंतर अनेक ‘प्लेअर्स’ मैदानाबाहेर जातील, आणि जनता फक्त प्रेक्षक म्हणून उरेल!
– थर्ड अंपायर
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 20 Apr 2026 8:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit हुबालवाडी येथील वीटभट्टीवरील घटना ईश्वरपूर । वाळवा तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हजेरी लावली, मात्... Read more















































































