Last Updated on 17 Sep 2025 4:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश – कराड, मलकापूरला ‘नमो उद्यान’
नरेंद्र मोदींकडून कराड व मलकापूरकरांसाठी वाढदिवसाची खास भेट!
सातारा । महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड व मलकापूर शहराचाही समावेश करण्यात आला असून, याठिकाणी ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी एकूण २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
राज्यातील शहरी भागात हरित उद्यानांचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘नमो उद्यान योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी नगरपालिकांना प्रत्येकी १ कोटींचा निधी वितरित केला जाणार आहे. या योजनेत कराड आणि मलकापूर शहराचाही समावेश व्हावा, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कराड आणि मलकापूर येथे नमो उद्यान साकारण्यासाठी प्रत्येकी १ कोटीप्रमाणे एकूण २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
‘नमो उद्यान’ ही योजना केवळ हरित पट्टे उभारण्यापुरती मर्यादित नसून, ती शहरी जीवनमान सुधारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या उद्यानांमुळे नागरिकांना निरोगी व शुद्ध हवा मिळून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी आधुनिक साधने आणि तर युवक व महिला यांच्यासाठी व्यायाम साधनांची सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक व शांत विश्रांती स्थळेही निर्माण केली जाणार आहेत. या हरित उद्यानांमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार असून, शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
दरम्यान, या उद्यानांची उभारणी केल्यानंतर शासनाकडून या उद्यानांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या ३ क्रमांकांसाठी नगरपालिकांना बक्षीस म्हणून अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कराड व मलकापूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार…
शहरी भागात हरित उद्यानांचे जाळे उभारून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण मिळावे, यासाठी शासनाने ‘नमो उद्यान’ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कराड व मलकापूरमध्ये लवकरच उद्याने उभारली जाणार असून, त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. तसेच कराड व मलकापूर शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले
जिल्हाध्यक्ष, भाजपा














































































