Last Updated on 06 Oct 2021 5:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई :
कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून जगभरात अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक आयटी कंपन्यांनी आणि इतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीसीएस कंपनीने सर्वांत आधी वर्क फ्रॉम होम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या या कंपनीने तब्बल ७०-८० टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २०२२ च्या सुरुवातीपर्यंत हे कर्मचारी परत ऑफिसला येण्याची शक्यता आहे.
विप्रो आणि इन्फोसिससारख्या आयटी कंपन्यांनी ऑफिस प्लॅनबाबत आपला हेतू स्पष्ट केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, विप्रोचे चेअरमन रिशाद प्रेमजी यांनी ट्वीट केले आहे की, फर्म आपल्या कार्यालयांमध्ये कोरोना व्हायरस प्रोटोकॉल लागू करत आहे. त्यामुळे या कंपन्याही वर्क फ्रॉम होम बंद करण्याच्या मार्गावर आहे.
आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांव्यतिरिक्त कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि येस बँक या वित्तीय गटांनी त्यांचे वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद करण्याचे संकेत दिले आहेत.














































































