Last Updated on 27 Jan 2025 10:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पशुसंवर्धन विभागाचे नागरिकांना आवाहन
नांदेड । बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.
यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारासंदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील केवळ किवळा या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. या ठिकाणी तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्डफ्लूची लागण नाही, असा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी केला आहे.
किवळा या गावी साधारणता 20 तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्षांमध्ये मृत पक्षी आढळून आल्याने त्याचे नमुने राज्य व राष्ट्रीयस्तरीय प्रयोग शाळेत निदानासाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेतील बर्डफ्लूसाठीचे नमुने पॉझिटिव्ह दिसून आल्यानंतर या गावामधील 1 किमी परिघाच्या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. त्यामध्ये साधारणपणे 382 मोठे पक्षी आणि 74 छोटे पक्षी असे एकूण 456 पक्षी नष्ट केले आहेत. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे.
बर्ड फ्ल्यूबाबत नागरिकांनी अफवा पसरवू नयेत – जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. महेश शेजाळ
कोल्हापूर : राज्यातील काही भागात एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा (बर्ड फ्ल्यू) पक्षांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात कोठेही पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 18002330418/ 1962 वर त्वरीत दूरध्वनी करुन कळवावे. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत तसेच बर्ड फ्ल्यु आजाराबाबत नागरिकांनी अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी केले आहे.













































































