Last Updated on 19 Mar 2025 5:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कृष्णा नदीत मळी मिश्रित पाणी; जलचर जीवांसह लोकांच्या आरोग्याला धोका
सांगली : कारखान्यांच्या धुराड्यातून उडणारी राख चार महिने सोसल्यावर आता कृष्णा नदीत सोडल्या जाणाऱ्या मळीमुळे नागरिकांना गढुळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. कारखाने बंद झाले असले तरी त्यांची घाण नदीत मिसळत असल्याने जलचर जीवांसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
बऱ्याच कालावधीपासून कृष्णा नदीत कारखान्यांचे सांडपाणी मिसळले जात आहे. परिणामी, नदीच्या पाण्याचा रंग वरचेवर काळपट होत असून, पृष्ठभागावर तवंग आणि फेस साचत आहे. तांबवे डोहाजवळील पाणी वरचेवर दूषित होत आहे. याचा थेट परिणाम नदीतील मासे आणि अन्य जलचर जीवांवर होत असून, अधूनमधून मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडत आहेत. कृष्णाकाठाला राहणाऱ्या नागरिकांनाही आता दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार, उलट्या-जुलाब यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
नळपाणी पुरवठा धोक्यात
नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी पुरवठा योजनांचे फिल्टर प्रकल्पही या प्रदूषणामुळे प्रभावित झाले आहेत. मळीमिश्रित, तेलकट पाण्यामुळे या प्रकल्पांमध्ये वापरली जाणारी वाळू चिकट होत आहे, त्यामुळे पाणी गाळण्याची कार्यक्षमता कमी होत आहे. परिणामी, हेच दूषित पाणी नागरिकांच्या घराघरांत पोहोचत आहे.
कृष्णा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
चार महिने धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या राखेचा त्रास सहन केला, आता मळी मिश्रित पाणी प्यायचं का? असा संतप्त सवाल नदीकाठच्या जनतेकडून उपस्थित केला जात आहे.














































































