Last Updated on 13 Nov 2021 9:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहककेंद्रीत उपक्रमांचा प्रारंभ
नवी दिल्ली ।
‘यूपीआय’मुळे अतिशय कमी कालावधीमध्ये भारताला डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत जगातला आघाडीचा देश बनवले आहे. अवघ्या सात वर्षांमध्ये भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये 19 पट वृद्धी झाली आहे.अत्यंत कमी कालावधीत भारत हा डिजिटल व्यवहारांत जगात अग्रेसर बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील युपीआय सुविधांचे कौतुक करताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्रीत उपक्रमांचा प्रारंभ केला. यामध्ये किरकोळ थेट गुंतवणूक योजना आणि रिझर्व्ह बँक- एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या काही वर्षापर्यंत बँकिंग, विमा आणि पेन्शनसारख्या सुविधांचा फायदा देशातील काही खास आणि कमी लोकांना मइळत होता. देशातील सर्वसामान्य नागरिक, गरीब कुटुंबे, शेतकरी, छोटे व्यावसायिका, व्यापारी, महिला, दलित, वंचित, मागास वर्गासाठी ही सुविधा उपलब्ध होऊ शकत नव्हती. यासोबतच बँकिंगच्या क्षेत्रात शाखांची कमतरता, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इंटरनेट कनेक्शनसारख्या त्रुटी अस्तित्वात होत्या. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या या सुविधांवर आधी लक्ष देण्यात आले नव्हते.
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेसारख्या महत्वाच्या वित्तीय संस्थांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘ आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात 21व्या शतकातल्या सध्याच्या दशकाचा काळ हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. अशावेळी रिझर्व्ह बँकेची अतिशय महत्वाची भूमिका असणार आहे. रिझर्व्ह बँकेची संपूर्ण टीम देशाच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे.’’
पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले की, गेल्या सात वर्षांमध्ये एनपीए अर्थात बुडीत मालमत्तांविषयी पारदर्शकता आली आहे. एनपीएचे नेमके काय करायचे आणि वसुली यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे पुनर्भांडवलीकरण केले आहे. एकूणच वित्तीय प्रणाली आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की, आता एकूण बँकिंग क्षेत्राला अधिक बळकटी आणण्यासाइी सहकारी बँकांनाही रिझर्व्ह बँकेच्या पूर्वावलोकनाखाली आणण्यात आले आहे. त्यामुळेही या बँकांच्या कारभारामध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठेवीदारांचा बँकिंग प्रणालीवरचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
आपली बँकिंग कार्यप्रणाली 24 तास, सातही दिवस आणि 12 महिने कधीही, देशात कुठूनही आपल्यासाठी कार्यरत असते. गुंतवणूकदारस्नेही आणि त्यांच्याविषयी संवेदनशीलतेची भावना असलेला एक देश, अशी भारताची नवीन ओळख रिझर्व्ह बँक अधिक मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.









































































