Last Updated on 23 Mar 2025 10:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे : महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीचे मोठे आंदोलन पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू; गटशेती करणाऱ्यांना कशा प्रकारे मदत, योगदान देता येईल; आणि गटशेतीला आंदोलनाचे स्वरूप कसे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते’ फार्मर कप- 2024 पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या प्रसंगी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान, श्रीमती किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते.
शेती शाश्वत करायची असेल तर आपली गावे जलसमृद्ध, जलपरिपूर्ण होणे आवश्यक आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, 52 टक्के महाराष्ट्र अवर्षण प्रवण आहे, त्यामुळे जलसंधारणातूनच परिवर्तन करू शकतो. गावे पाण्याचे अंकेक्षण करणार नाहीत, त्यातील शास्त्र शिकणार नाहीत त्यात लोकसहभाग वाढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र दुष्काळीच राहील हे लक्षात घेऊन राज्य शासनाने 2015 साठी जलयुक्त शिवार योजना सुरू करून एक जनआंदोलन सुरू केले.त्यावेळी पाणी फाउंडेशनने लोकांमध्ये जलसंधारणाच्या कामांची चुरस निर्माण केली. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी पाण्याचे काम पुढे नेले. पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन यांनी या चळवळीला एक लोक चळवळीचे रूप दिले. आणि महाराष्ट्रातील 20 हजार गावांनी स्वतःला जलसमृद्ध केले. फक्त पाण्याचे लेखापरीक्षण करून चालणार नाही तर शेतकरी सक्षम झाला तर पाण्याचे नियोजनही तो स्वतः करू शकतो. म्हणून फार्मर कप सुरू केला.सुरूवातीला गटशेतीअंतर्गत किमान 20 शेतकरी आणि शंभर एकर जमीन असा गट तयार केल्यास एक कोटी रुपयांपर्यंत गटाला मदत दिली जात होती. ती चळवळ 2019 नंतर थांबली होती. परंतु, अनेक गट त्यावेळी सुरू झाले. त्यामुळे आता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू, असेही ते म्हणाले.
अंतिम फेरीतील सर्व गटांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख

यावेळी फार्मर कपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व 25 शेतकरी गटांना राज्य शासनाच्यावतीने प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पाणी फाउंडेशनचे काम संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आमिर खान यांचे अभिनंदन केले.
कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, पाणी फाउंडेशनमध्ये काम करणारे गट एकत्र आल्यामुळे निस्वार्थपणे काम होते. गटाने एकत्र येऊन, एक विचाराने शेती करणे ही खूप मोठी बाब आहे. या माध्यमातून मोठी क्रांती होऊ शकते. चांगली शेती करणाऱ्यांच्या पाठीशी शासन निश्चितपणे उभे आहे. आपण खाणाऱ्या प्रत्येक घासामागे शेतकऱ्याच्या घामाचा, कष्टाचा अंश असतो, ही गोष्ट समाजातील कोणत्याही घटकाने विसरू नये, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र शासनातर्फे फार्मर कपमध्ये पुरस्कारप्राप्त प्रत्येक गटास एक ड्रोन मोफत देण्यात येईल. ड्रोन देण्यात येणाऱ्या गटांनी रासायनिक किटकनाशकांची फवारणी करू नये. नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांच कल वळवणे आवश्यक आहे. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने दरवर्षी वर्षाला 5 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यास पाच वर्षात 25 हजार कोटी रुपयांतून महाराष्ट्राचा कायापालट करू शकतो. त्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले.
आमिर खान म्हणाले, लहान शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती नफा देणारी, खर्च कमी करू शकतो का तसेच उत्पन्न वाढवू शकतो का, असे स्वप्न आम्ही तीन वर्षापूर्वी पाहिले. योग्य ज्ञान आणि शिक्षणातून उत्पादन वाढवू, रासायनिक खतांचा वापर कमी करू शकतो का याचा विचार केला होता. आज गटशेतीमुळे हे साध्य झाल्याचे दिसत आहे. यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यापासून उभे आहेत. कृषी विद्यापीठांचे संशोधक, पाणी फाउंडेशनचे सर्व सदस्य यांचे मोठे काम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षेनुसार फाउंडेशन यावर्षीपासून पूर्ण महाराष्ट्रात काम करेल, असेही ते म्हणाले.
किरण राव म्हणाल्या, पाणी फाउंडेशनने 2016 मध्ये वॉटर कप आयोजित केला. पाणी फाउंडेशनच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून महिला शेतकरी या चळवळीत आघाडवर आहेत. मात्र, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे संकटाला शेतीला सामोरे जावे लागत आहे. फार्मर कप आणि गट शेती या संकटाचा सामना करण्यासाठी मातीचे आरोग्य सुधारणे, 6 हजाराहून अधिक गावात जलसंधारणाची कामे केली आहेत. बायो इथेनॉल, सौर शेती तसेच ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून हवामान बदलाच्या आव्हानाला संधी म्हणून शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ. पोळ, श्री. भटकळ, एटीई फाऊंडेशनचे अमित चंद्रा, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, सह्याद्री फार्म्सचे चेअरमन विलास शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
पाणी फाऊंडेशनच्या संपूर्ण महाराष्ट्र स्पर्धेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झाला.
यावेळी फार्मर कप स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सांगली जिल्ह्यातील तुर्ची (ता. तासगाव) येथील भाग्योदय शेतकरी गटाला, द्वितीय पुरस्कार विभागून सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता. खटाव) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोबलगाव (ता. खुलताबाद) येथील उंच भरारी महिला शेतकरी गटाला, तृतीय पुरस्कार विभागून हिंगोली जिल्ह्यातील कवडा (ता. कळमनुरी) येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गटाला आणि वाशिम जिल्ह्यातील नागी (ता. मंगरूळपीर) येथील माऊली शेतकरी गटाला देण्यात आला.
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, अभिनेते मकरंद कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, छाया कदम, अनिता दाते आदींसह फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकरी गटांचे सदस्य महिला व पुरूष शेतकरी उपस्थित होते.














































































