Last Updated on 08 Jul 2020 6:19 AM by
मान्सून अधोरेखित / परिमिता माने
महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्याच भागात वरुणराजाने हजेरी लावली आहे.त्याच्या येण्याने तन आणि मन सुखावले असले तरी यंदाच्या त्याच्या आगमनावर कोरोनाच्या भितीचे सावट नक्कीच आहे.

कोरोनामुळे यंदा वर्षा सहलींचा आनंद तर घेता येणार नाहीच परंतू इतरवेळी पेक्षा यंदाच्या पावसाळ्यात मात्र तब्बेतीला जास्तच जपावं लागणार आहे.या दिवसांत पर्यावरणात बदल होतो.हवेतील दमटपणा वाढल्यामुळे वातावरणातील जंतूंचे प्रमाण वाढते.वातावरणातील या बदलांशी जुळवून घेत असताना आपल्या शरीराची भूक पचनशक्ती मंदावते,परिणामी शरीर संवेदनशील,नाजूक झालेले असते,त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे अपरिहार्य आहे.या लेखात पावसाळ्यात खाण्या पिण्याच्या सवयीतून आरोग्य कसे सांभाळावे,याची माहिती करून घेऊया.
१.मागील चार पाच महिन्यांपासून तरी तुम्हाला पाणी उकळून पिण्याची सवय झालीच असेल म्हणा.तरीही फक्त कोरोनाच्या भिती पोटी अथवा पावसाळा आहे म्हणूनच उकळलेले पाणी न पिता प्रत्येकऋतु मध्येच प्यायचे पाणी उकळून घेणे कायमच चांगले असते.
२.पावसाळ्यातील आहार हा ताजा आणि गरमच असणे आवश्यक आहे.पावसाळ्यात भूक कमी लागत असल्याने इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात चार घास कमी खाणे चांगले असते.विशेषतः संध्याकाळी अगदी हलके अन्न खावे..
३.शरीरात कोरडेपणा वाढविणारे पाव,चुरमुरे,मैद्यापासून बनविलेले पदार्थ वगैरे टाळावे.तसेच पचण्यास जड व वात वाढविणारे पदार्थ टाळावेत.
४.बाहेरील अन्न,शिळे अन्न टाळणेच चांगले.
५.याबरोबरच फार गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे,खेळती हवा नसणाऱ्या ठिकाणी न राहणे,ओल आलेल्या ठिकाणी न राहणे,या गोष्टीही कटाक्षाने पाळाव्यात.

वातावरणात होणारे बदल थांबवणे आपल्या हातात नसले तरी त्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आपल्या सवयींमधून आपली प्रतिकारशक्ती वाढवणे तरी आपल्याच हातात आहे ना!
आत्ताच्या काळात खरी गरज आहे ती प्रतिकारशक्ती वाढविण्याची.नियमित व्यायाम,योगा आणि योग्य व संतुलीत आहार यांच्या समन्वयातून आपण वातावरणातील बदलांशी नक्कीच जुळवून घेवू शकतो.













































































